मुंबई- मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ झाला असून, मुस्लिम आमदार आक्रमक झाले आहेत. मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवरून मुस्लिम आमदारांनी दोनदा राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विधानसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम आरक्षणावरून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यावेळी मुस्लिम आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेनं कागदही भिरकावली आहेत. अबू आझमी, आसिफ शेख, अब्दुल सत्तार, सतीश पाटील, अमिन पटेल आणि अस्लम शेख या सहा आमदारांनी एकत्र येत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. आम्ही कधी सेलिब्रेशन करायचं, मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगावी, असंही बॅनर घेऊन काल एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इम्तियाज जलील विधान भवन परिसरात उभे होते. मराठा आरक्षणावरून आज विधिमंडळ सभागृहात मोठा गदारोळ झाला आहे. त्यावेळी विरोधकांनी सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच धारेवर धरले आहे. धनगर समाजाचा अहवाल पटलावर ठेवावा, मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, असं सांगितलं होतं, परंतु आता त्यांनी चेंडू केंद्राकडे टोलवला आहे. शिक्षणाच्या बाबतीत 5 टक्के मुस्लिमांना दिलेलं आरक्षण हायकोर्टानं मान्य केलं आहे, मराठा समाजालाही आरक्षण मिळालंच पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत. ''माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असे वक्तव्य सभागृहाबाहेर केलं. पण, आरक्षणाचा अहवाल आला असून तो ताबडतोब सभागृहात ठेवावा. मुख्यमंत्र्यांनी बाहेर घोषणा करण्यापेक्षा या संबंधीचं विधेयक सभागृहात ठेवावं, याबाबत कुणाचही दुमत नाही. सध्याच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाव, अशी मागणी ज्येष्ठ नेते आमदार गणपत आबा देशमुख यांनी केली आहे.
पळवापळवी, फेकाफेकी... मुस्लिम आरक्षणावरून विधानसभेत गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:57 PM