Join us  

विधीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात ...! विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर संघटनांची मागणी

By सीमा महांगडे | Published: November 25, 2022 9:30 PM

ना अर्ज भरण्याची सोय, ना हॉल तिकीट, परीक्षा द्यायची कशी ?

मुंबई२ दिवसानंतर परीक्षा आणि मुंबई विद्यापीठाच्या विधी विद्यार्थ्यां अद्यापही प्रवेशपत्र न मिळाल्याने आम्ही परीक्षा द्यायची कि नाही हे विद्यापीठाने स्पष्ट करावे असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी केल्याच आहेत शिवाय विविध विद्यार्थी संघटनांकडे ही धाव घेतली आहे. मात्र तांत्रिक अडचण ही महाविद्यालयांकडून असून विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी करत, काँग्रेस, बाळासाहेबांची शिवेसना, अभाविप या साऱ्या संघटनांनी विद्यापीठा विरोधात आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. 

विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी परीक्षेपूर्वी विद्यापीठाकडे अर्ज दाखल करणे आवश्यक असते. मात्र, काही महाविद्यालयांतील विद्याथ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात तांत्रिक अडचण येत आहे. परीक्षेचे अर्ज अजून भरून झालेले नाहीत, त्यामुळे प्रवेशपत्र मिळण्याबाबत गोंधळ आहे, अशी माहिती विद्यार्थी विद्यार्थी संघटनांना देत आहेत. दरम्यान परीक्षेला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि अद्याप विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले नाही. विद्यापीठ २९ नोव्हेंबरला परीक्षे अहोणार असे जाहीर करून मोकळे झाले असताना अर्जच भरला नाही, प्रवेशपत्र नाही तर विद्यार्थी परीक्षा देणार कसे असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते धनंजय जुन्नरकर यांनी उपस्थित केला आहे.

विधीच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असून कुलगुरूंनी स्वतः यामध्ये लक्ष द्यावे असे पत्र बाळासाहेबांची शिवसेना संघटनेचे सचिन पवार यांनी कुलगुरूंना लिहिले आहे. महाविद्यालयाच्या तांत्रिक चुकांसाठी त्याना जाब विचारून तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र उपलब्ध करून त्यांची अडचण सोडवावी असे पवार यांनी म्हटले आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेत विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी त्यांनी कुलगुरू शिर्के याना पत्र पाठवून केली आहे. 

विधी परीक्षा अर्जाबाबत विद्यापीठाचे स्पष्टीकरण काही विधी महाविद्यालयानी प्रथम व द्वितीय वर्षाचा विद्यार्थ्यांचा deta त्या त्या वेळी एमकेसीएलच्या पोर्टलवर भरला नसल्याने त्यांचे सत्र ५ ची नोंदणी झालेली नाही यामुळे त्यांचा सत्र ५ चा परीक्षा अर्ज जनरेट झाला नाही.सदर महाविद्यालयानी ज्या विद्यार्थ्यांचा डेटा भरला नाही, त्यांनी तो एमकेसीएलच्या पोर्टलवर तात्काळ भरावा जेणेकरून त्यांचा परीक्षा अर्ज जनरेट होईल. २३ नोव्हेंबर पासून परीक्षेची प्रवेशपत्रे देण्यात आली आहेत, राहिलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा महाविद्यालयाने भरल्यास त्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट उपलब्ध होईल, यासाठी विद्यापीठातील कर्मचारी आज चौथा शनिवार सुट्टीच्या दिवशी कार्यालयात उपलब्ध असतील. विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन नसून ४ नोव्हेंबर पासून परीक्षा सुरू असून आजपर्यंत १ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रे देण्यात येतील व विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील निर्धारित तारखेस घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबई