वही हरविल्याने विद्यार्थिनीला शिक्षिकेकडून बेदम मारहाण! बोरीवलीच्या शाळेमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 04:55 AM2018-02-01T04:55:11+5:302018-02-01T04:57:30+5:30
वही हरवल्याचे सांगितल्याने एका १४ वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षिकेने बेदम मारहाण केली. बोरीवलीच्या आर. सी. पटेल हायस्कूल या शाळेत शनिवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.
- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : वही हरवल्याचे सांगितल्याने एका १४ वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षिकेने बेदम मारहाण केली. बोरीवलीच्या आर. सी. पटेल हायस्कूल या शाळेत शनिवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.
चेतना राजू शर्मा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. चेतनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी हिंदी आणि गुजराती विषयाच्या शिक्षिका नम्रता ओझा यांचा तास सुरू झाला. ज्या मुलांच्या वह्या अपूर्ण आहेत, त्यांना शिक्षिकेने उभे राहण्यास सांगितले. तेव्हा १०-१२ विद्यार्थ्यांसह चेतनादेखील उभी राहिली. अपूर्ण वह्या असलेल्या मुलांना ओझा यांनी स्टीलच्या पट्टीने हातावर मारण्याची शिक्षा केली. त्यानंतर, त्या चेतनाकडे आल्या. त्या वेळी वही हरवली असून, मी दोन दिवसांत सर्व अभ्यास पूर्ण करून आणेन, असे चेतनाने शिक्षिकेला सांगितले. मात्र, त्यांनी तिचे काहीच न ऐकता तिच्या उजव्या हातावर पट्टीने मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे चेतनाचा हात सुजला. वर्गातील मॉनेटरने तिच्या हाताला बाम चोळला. नंतर चेतना घरी निघून गेली. तेव्हा तिची आई भावना तिला शताब्दी रुग्णालयात घेऊन गेली. चेतनाच्या हातावर उपचार करून तिला घरी सोडण्यात आले. तथापि, त्यानंतरही हाताच्या वेदना थांबत नसल्याने, चेतनाला त्यांच्या फॅमिली डॉक्टरने नेण्यात आले. तेव्हा तिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर, चेतनाच्या कुटुंबीयांनी ओझा मॅडमविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अद्याप या प्रकरणी अटक झालेली नाही.
अशी हरवली वही
ती चारकोपच्या राजवैभव सोसायटीत आई, वडील, दोन बहिणी यांच्यासोबत राहते. यापूर्वी ती महावीरनगरमध्ये राहत होती. मात्र, दीड महिन्यापूर्वीच ती चारकोपमध्ये राहण्यास आली. सामान हलवताना चेतनाच्या शाळेच्या गुजराती आणि हिंदी विषयाच्या दोन वह्या हरवल्या.