विद्यार्थी भारतीने केली मोदींची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 05:13 PM2020-08-06T17:13:54+5:302020-08-06T17:14:02+5:30
त्या रामाला मानणारे मोदी जनतेचा व विद्यार्थ्यांचा विचार का नाही करत, अशा भूमिकेत विद्यार्थी भारतीचे कार्यकर्ते रामाकडे मोदींची तक्रार भजन गाऊन केली.
मुंबई : विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ खेळू नका, रामाकडून बोध घ्या, राम राज्याला जाणून घ्या. देशातील तरुणांना मृत्यूच्या धोक्यापासून वाचवा, असा आवाज विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सोशल मीडियामार्फत उठविला. सरकारने परीक्षा ऐच्छिक ठेवण्याचा वटहुकूम काढावा. विद्यार्थ्यांनी किती विनवण्या कराव्या? त्यांनी किती वेळ संभ्रमात जगायचे ? अशी तक्रार विद्यार्थी भारती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी रामाकडे केली. ज्या रामाने आपल्या प्रजेच्या हिताचा कायम विचार केला, जनतेसाठी काम केले. त्या रामाला मानणारे मोदी जनतेचा व विद्यार्थ्यांचा विचार का नाही करत, अशा भूमिकेत विद्यार्थी भारतीचे कार्यकर्ते रामाकडे मोदींची तक्रार भजन गाऊन केली.
मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी भारती संघटना अंतिम सत्राच्या परीक्षांविरोधात लढा देत आहेत. अनेक आंदोलने, पत्रव्यवहार करून देखील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला जात नाही. विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल आणि युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांना पत्र पाठविले. सोशल मीडियावरून तक्रार नोंदविली जात आहे. उपोषण करणे, 'बोंबा मारो' आंदोलन केले आहे.
अंतिम सत्राच्या परीक्षांच्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालय तारखांवर तारखा देत आहेत.
युजीसी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. मात्र देशातील विद्यार्थी भूकमारी, गरिबी, लॉकडाऊनमुळे परीक्षा देण्यास मानसिक, शारीरिक परिस्थितीच्यादृष्टीने तयार नाही. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच वक्तव्य केले नाही. त्यामुळे विद्यार्थी भारतीच्यावतीने सोशल मीडियाद्वारे प्रभू श्री रामाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीची तक्रार केली आहे.