मुंबई : विद्याविहार येथील राजावाडी कॉलनी-चित्तरंजननगरमधील तीन मजली प्रशांत निवास रविवारी खचून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या नरेश पालांडे (५६), अलका पालांडे (९६) या मायलेकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या श्वानाचाही या दुर्घटनेत अंत झाला. दरम्यान, या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची व जखमींची मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट घेतली. बचावकार्याची पाहणी करून या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
इमारतीतील जखमींना २० तासांनी बाहेर काढण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या मायलेकांचा मृत्यू झाला. नरेश पालांडे हे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई आणि श्वान कोकोसोबत गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी भाड्याने राहत होते. रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्यांची इमारत खचली. घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफ, अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण येत होते. एनडीआरएफच्या जवानांनी तिसऱ्या मजल्यावरील मनन नरिया (३०), माहिरा नरिया (२८) त्यांचे वयोवृद्ध आईवडील यांना बाहेर काढले. त्यापाठोपाठ पालांडे कुटुंबीयांतील आर्यनलाही (२०) सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दुसरीकडे नरेश व अलका हे ढिगाऱ्याखाली अडकले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास अलका यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले.
जिवंतपणी नाही, पण अखेरच्या प्रवासात तरी... नरेश पालांडे राहण्यास असलेल्या बर्माशेल या बैठ्या चाळींच्या पुनर्विकासाचे काम गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे. या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. इमारतीच्या कामकाजाकडे लक्ष असावे, म्हणून त्यांनी इमारतीजवळ असलेल्या प्रशांत निवासमध्ये भाड्याने घर घेतले होते. मात्र हक्काच्या घरात कुटुंबीयांसोबत वास्तव्य करण्याचे पालांडे यांचे स्वप्न अधुरेच राहिले. म्हणून आईसह त्यांचे पार्थिव निर्माणाधीन असलेल्या इमारतीच्या आवारात आणण्यात आले. तेथूनच त्यांच्या अखेरच्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यावेळी साश्रुनयनांनी पालांडे यांना निरोप देण्यात आला. पालांडे हे सर्वांच्याच मदतीला धावून जाणारे होते. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.
पत्नी आणि मुलगी आदल्या रात्री नातेवाइकांकडे...नरेश पालांडे यांची पत्नी मुलीसोबत मुलुंडला राहणाऱ्या नातेवाइकांकडे गेल्या होत्या. त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या आहेत. मुलाची उडी...पालांडे यांचा मुलगा आर्यनने पहिल्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे तो यातून थोडक्यात बचावला आहे.