मुंबई : शासनाच्या नियमावलीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात यंदा शुकशुकाट दिसून येत असला, तरीदेखील घरगुती गणेशमूर्तींचे येथे अत्यंत आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. या देखाव्यांमधून विविध सामाजिक विषयांना हात घालण्यात आला आहे. तर काही देखाव्यांमधून भारतातील विविध आकर्षक ठिकाणे व जुन्या आठवणीही साकारण्यात आल्या आहेत. गिरगावच्या चिरा बाजार येथील रेळे कुटुंबीयांनी आपल्या घरच्या बाप्पासाठी मुंबईतील मोठ्या गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असणारा राजन व विजय खातू यांचा परळ येथील गणेशमूर्तींचा कारखाना साकारला आहे.
गेली दोन वर्षे मुंबईत गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट कायम असल्याने मुंबईकरांना गणेशमूर्तींचे भव्य आगमन सोहळे अनुभवता आले नाहीत. यामुळे अनेक भाविक पुन्हा एकदा हे आगमन सोहळे कधी पाहायला मिळतील याची वाट पाहत आहेत. परंतु, तेच वातावरण व तोच उत्साह रेळे कुटुंबीयांनी आपल्या बाप्पाच्या देखाव्यात साकारला आहे. हा देखावा उभा करण्यासाठी रेळे कुटुंबीयांना दोन महिन्यांचा कालावधी लागला.
जगातून कोरोना संपूर्णपणे नाहीसा होऊन पुन्हा एकदा असे आगमन सोहळे मुंबईकरांना अनुभवायला मिळावेत असे या देखाव्याच्या माध्यमातून गणरायाकडे आम्ही साकडे घालत असल्याचे रेळे कुटुंबातील सदस्य मन रेळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या देखाव्यामध्ये खातू यांच्या कारखान्याबाहेर गणेशमूर्तींच्या आगमनासाठी जमलेली गर्दी, ढोल-ताशा पथक, कारखान्याबाहेर लावण्यात आलेले आगमन सोहळ्याचे होर्डिंग व प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणारी उत्सुकता हे सर्व साकारण्यात आले आहे. यामुळे गणरायाच्या आगमनासाठी आतुर असलेल्या मुंबईकरांचा जणू उत्साहच या देखाव्यातून पाहायला मिळत आहे.