परदेशी पर्यटकांसाठी मुंबईत व्यूइंग गॅलरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 10:07 PM2016-10-25T22:07:24+5:302016-10-25T22:07:24+5:30
पुरातन वास्तूंचा वारसा असलेल्या कुलाबा, फाेर्ट, चर्चगेट विभागाचा कायापालट करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई , दि. 25 - पुरातन वास्तूंचा वारसा असलेल्या कुलाबा, फाेर्ट, चर्चगेट विभागाचा कायापालट करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. विशेषता परदेशी पर्यटकांसाठी व्यूइंग गॅलरी बांधण्यात येणार आहे. ही गॅलरी टर्मिनसच्या पूर्व बाजूला जोडणाऱ्या भूमिगत पदचारी मार्गाच्यावर उभारण्यात येणार आहे. याबाबतच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी आज आधिकाऱ्यांना दिले महत्वाची सरकारी व खाजगी कार्यालय असलेल्या ए वार्डमध्ये दररोज लाखो लोकांची वर्दळ असते. तसेच या विभागात असलेली पुरातन व ऐतहासिक स्थळ परदेशी पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. मात्र या वस्तुंची छायाचित्र काढण्यासाठी स्वतंत्र व्यूइंग गॅलरी नसल्याने अनेकवेळा पर्यटक रस्त्यावरच उभे राहून छायाचित्र काढत असतात, त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. याची दखल घेऊन आयुक्तांनी आज अधिकाऱ्यांसह फॅशन स्ट्रीट परिसर, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि चर्चगेट रेल्वे स्टेशन, दोन्ही भूमिगत पदचारी मार्ग, भाटिया बाग आदी ठिकाणाची पाहणी केली.