मुंबई : मलबार हिल येथील व्ह्यूइंग गॅलरीवरून चालणाऱ्या प्रेक्षकांकडून ‘मोझाक टाईल्स’वर रेखाटलेले महापालिकेचे बोधचिन्ह पायदळी तुडवले जात आहे. या प्रकरणी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी दिली. पालिकेच्या बोधचिन्हाचा अपमान करणारी ‘मोझाक टाईल्स’ बदलण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मलबार हिलच्या हँगिंग गार्डनशेजारी ही चार मजली प्रेक्षक गॅलरी बनविण्यात आली आहे. या गॅलरीला वर्षाला सुमारे दहा हजारांहून अधिक मुंबईकर भेट देणार असून, टाईल्सवरील पालिकेचे बोधचिन्ह पायदळी तुडविणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. गुरुवारी दुपारी प्रेक्षक गॅलरीला भेट दिली असता ती कुलूपबंद होती, अशी माहिती पिमेंटा यांनी दिली.
याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात माहिती घेतो, असे त्यांनी सांगितले.