मुंबई : इसिसच्या दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने भारतात प्रवेश केल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यामुळे मुंबईसह राज्यात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी सर्व घटक प्रमुखांना दिले आहेत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.इसिसचे १५ दहशतवादी सागरी मार्गाने लक्षद्वीपकडे रवाना झाले असून, खबरदारी घेण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे केरळ किनारपट्टीवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, संशयितांचा शोध सुरू आहे. मुंबई ही अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याने येथे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.महत्त्वाची ठिकाणे, विमानतळ, रेल्वे स्थानके व गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. संशयित व्यक्ती, वस्तूंबद्दल तातडीने पोलिसांना माहिती द्यावी; तसेच कोणत्याही अफवांना बळी न पडता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह राज्यात दक्षतेचा इशारा, इसिसचे दहशतवादी देशात आल्याच्या संशयामुळे सुरक्षा यंत्रणा सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 6:17 AM