‘लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजाराविषयी जाणीव- जागृती होणे आवश्यक’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:08 AM2018-11-18T05:08:14+5:302018-11-18T05:09:15+5:30
लठ्ठपणा हे बहुतांश आजारांचे मूळ असल्यामुळे त्याविषयी समाजात जाणीवजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. अनियमित जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.
मुंबई : लठ्ठपणा हे बहुतांश आजारांचे मूळ असल्यामुळे त्याविषयी समाजात जाणीवजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. अनियमित जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. लहान मुले तसेच प्रौढांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्यामुळे त्याची विशेष दखल घेतली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी शुक्रवारी केले.
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र आरोग्यदीप’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात करण्यात आले. त्या वेळी राज्यपाल बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत, डॉ. स्वप्नेश सावंत, डॉ. दीपक नामजोशी, मुद्रक आनंद लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, लहान मुले व प्रौढांमध्ये स्थूलतेचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये याबाबत जाणीवजागृती करणे आवश्यक आहे. या दिवाळी अंकामध्ये स्थूलता आणि त्यामुळे होणारे आजार या विषयावर तज्ज्ञांनी लेखन केले असल्याने त्याचा सामान्य नागरिकाला नक्कीच उपयोग होईल. महाराष्ट्रात दिवाळी सणामध्ये फराळाबरोबरच दिवाळी अंकांचे अतूट नाते आहे. दिवाळी अंकांमुळे वाचन संस्कृती जपण्यास मदत होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आरोग्यदीप दिवाळी अंकात मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत माहिती असल्यामुळे सर्वांसाठी सोयीस्कर ठरणार आहे़
दुष्परिणाम टाळणे शक्य
प्रत्येक शाळेमध्ये मोफत दंत तपासणी, वैद्यकीय शिबिर आयोजित केले पाहिजे. त्यामुळे भविष्यात आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपालांनी या वेळी केले.
आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, स्थूलतेचे नेमके कारण काय, त्यापासून होणारे आजार, याची नेमकी माहिती वाचकापर्यंत पोहोचावी यासाठी दिवाळी अंकाचा प्रयत्न केला आहे.