Join us

मुंबई पोर्ट ट्रस्टकडून सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:06 AM

मुंबई : तौउते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई बंदराशी निगडित सर्व व्यक्तींना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळाची तीव्रता कमी होईपर्यंत ...

मुंबई : तौउते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई बंदराशी निगडित सर्व व्यक्तींना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळाची तीव्रता कमी होईपर्यंत कोणीही समुद्रात प्रवेश करू नये, असे आदेशही बजावले आहेत.

जहाज, फेरीबोट आणि बार्ज मालकांनी कर्मचाऱ्यांना पाण्यात उतरवू नये. आपल्या सामग्रीला चक्रीवादळाचा कोणताही फटका बसू नये यासाठी उपाययोजना करावी, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच वादळाची तीव्रता कमी होईपर्यंत जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. बंदराशी संबंधित बांधकामांकरिता सेवेत असलेल्या लहान बोटी, यंत्रे आणि इतर वस्तू सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टकडून सांगण्यात आले. मोठी जहाजे वादळाच्या परिघाबाहेर नांगरून ठेवावीत. जहाजावरील सामग्रीला हानी पोहोचणार नाही, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. लहान बोटी अद्यापही समुद्रात असल्यास त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी येण्यास सांगावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.