मुंबई : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व दोन आयुक्त महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी रात्री मुंबईत पोहोचले. शुक्रवारी ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करतील.
राजकीय पक्षांच्या अडचणी आयोग जाणून घेईल. प्रमुख राजकीय पक्षांचे एक किंवा दोन प्रतिनिधींना बैठकीला येण्याची अनुमती देण्यात आली आहे. मतदारांची नावे गहाळ होणे, मतदार केंद्र बदलले जाणे या संदर्भात राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीत अनेक तक्रारी केल्या होत्या. राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, निवडणुकीशी संबंधित सचिव आणि पोलिस अधिकारी यांचीही बैठक आयोग शुक्रवारी घेणार आहे. शनिवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची आयोग बैठक घेईल. त्यानंतर दुपारी आयोगाची पत्र परिषद होणार आहे. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात लागू होईल असा अंदाज आहे.