‘लोकमत’तर्फे मयूर शेळके यांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रुळाजवळ एक मुलगा पडला हाेता. पॉईंट्समन मयूर सखाराम शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या मुलाचा जीव वाचवला. शेळके यांच्या या धाडसाबाबत ‘लोकमत’ने त्यांचा सत्कार केला.
मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.२५ वाजता एक मुलगा रेल्वे रुळावर पडल्यानंतर कसाबसा उठून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र लहान असल्याने त्याला प्लॅटफॉर्मवर चढता येत नव्हते ते मयूर शेळके यांनी पाहिले. त्याचवेळी अपमार्गावर उद्यान एक्सप्रेस त्याच मार्गावर वेगाने येत होती. शेळके यांनी जीवाची पर्वा न करता तसेच क्षणाचाही विलंब न दवडता ट्रॅकवर उडी मारून मुलाच्या दिशेने धाव घेतली. मुलाला उचलले आणि प्लॅटफॉर्मवर ढकलले, त्यानंतर स्वत: क्षणात प्लॅटफॉर्मवर चढले. त्यांचे धाडस व समयसूचकतेमुळे मुलाचे प्राण वाचले.
आपल्या आईसमवेत प्लॅटफॉर्मवर चालत असताना मुलगा रुळावर पडला होता. या मुलाची आई दृष्टिहीन असल्याने मुलाला वाचवू शकत नव्हती. मुलगा पडल्याचे समजताच ती जिवाच्या आकांताने ओरडत हाेती.
* रेल्वेमंत्र्यांकडून कौतुक
रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी फाेन करून मुलाचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेल्या धाडसाबद्दल मयूर शेळके यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, त्यांच्या कार्याची तुलना कोणत्याही बक्षिसाशी किंवा पैशांशी केली जाऊ शकत नाही, परंतु आपल्या कामामुळे मानवतेला प्रेरणा दिल्याबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात येईल, असे सांगितले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल आणि इतरांनीही शेळके यांच्या या धाडसाचे कौतुक केले.
.........................