मुंबई : काश्मीरमधील बहुचर्चित ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाचे पडसाद देशभरात उमटण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. पोलिसांना सतर्कता बाळगण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरचे बहुचर्चित ३७० कलम हटविण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मांडताच देशभरातून अनेकांनी त्याचे स्वागत केले. मात्र, असले तरी काही पक्ष, संघटनांनी त्याला विरोध केला आहे. काही जण याविरोधात निदर्शने, आंदोलने करतील, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी बकरी ईद, गणपती, दहीहंडी आदी सणासुदीच्या काळात सार्वजनिक शांततेमध्ये कसलाही भंग होऊ नये, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी विशेष दक्षता बाळगण्याच्या सूचना पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महासंचालकांनी दिलेल्यया सूचनांनुसार शहरातील संवेदनशील तसेच महत्त्वाची ठिकाणे, पर्यटनस्थळे, रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणीही गस्त घालण्यात येत आहे.
मुंबईसह राज्यात दक्षता; काश्मीरमधील विशेष कलम हटविण्यावरून घातपाताची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 4:48 AM