मुंबईत सर्वत्र हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने पोहोचवा; उद्धव ठाकरे यांची माजी नगरसेवकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 05:29 AM2024-12-04T05:29:30+5:302024-12-04T05:41:46+5:30

आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो आहे. त्याला योग्य रीतीने प्रतिवाद करा, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला अनेक माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी हजेरी लावली होती.

Vigorously convey the issue of Hindutva everywhere in Mumbai Uddhav Thackeray's advice to former corporators | मुंबईत सर्वत्र हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने पोहोचवा; उद्धव ठाकरे यांची माजी नगरसेवकांना सूचना

मुंबईत सर्वत्र हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने पोहोचवा; उद्धव ठाकरे यांची माजी नगरसेवकांना सूचना

मुंबई : लोकमत न्यूज नेटवर्क विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेवरील सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी उद्धवसेनेने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मतदारांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत होती आणि यापुढेही लढेल, हे मतदारांच्या मनात ठसवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना मातोश्री येथे मार्गदर्शन करताना केले. 

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेने माजी नगरसेवकांना भावनिक साद घातली. शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक सध्या शिंदेसेनेच्या गोटात गेले असले, तरी उरलेल्या माजी नगरसेवकांसह नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मातोश्री येथे बैठक बोलावण्यात आली होती.महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा अत्यंत प्रखरतेने लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. शिवसेना हिंदुत्वासाठी यापूर्वीही लढत होती आणि यापुढेही लढत राहणार, हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करा. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो आहे. त्याला योग्य रीतीने प्रतिवाद करा, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला अनेक माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी हजेरी लावली होती.

संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्या 

भाजपचे कार्यकर्ते बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात पक्षासाठी काम करतात. त्याचप्रमाणे, आपणही तळागाळात जाऊन काम केले पाहिजे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा, आपल्याला पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे. सदोष ईव्हीएम प्रणालीचा मुद्दा या निवडणुकीमुळे पुढे आला आहे. त्या मुद्द्याबाबत आम्ही बघू. मात्र, शिवसैनिकांनी आता नव्याने संघटनात्मक बांधणी केली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि ताकदीने कामाला लागा. निवडणुका केव्हाही घोषित होऊ शकतात. त्यामुळे आता गाफील न राहता लोकांमध्ये जाऊन नव्या उमेदीने कामाला लागा, अशा सूचना यावेळी ठाकरे यांनी केल्या.

Web Title: Vigorously convey the issue of Hindutva everywhere in Mumbai Uddhav Thackeray's advice to former corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.