मुंबई : तो आहे दहा वर्षाचा. राहायला धारावीच्या कुंभारवाड्यात. घरची आर्थिक स्थिती बेतास बेत. मात्र, अंगात जिद्द असली तर हे सर्व फिके पडते आणि देणाऱ्यांचेही हजारो हात पुढे येतात. विहान चौहानच्या बाबतीत तेच झाले. माटुंग्याच्या एमपीएस एलके वागजे या महापालिका शाळेत चौथीत शिकणाऱ्या विहानची मूस गेम दक्षिण आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड झाली. महाराष्ट्रातून आठ जण होते. त्यातील दोघे पुण्यातले, तर सहाजण मुंबईतले. स्पर्धा होती थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये.
स्पर्धेला जायचे तर एक लाख रुपये खर्च होता. धारावीतील लोकांनी त्याचा हा आर्थिक भार उचलला आणि विहानने बँकॉक गाठले. तिथे १५ देशांतून १८ हजार विद्यार्थी आले होते. विहानने अफलातून शारीरिक कवायती दाखवल्या आणि घसघशीत तीन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई केली.
२९ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान झालेल्या या स्पर्धेत विहानने पॅरलल बार, स्टिंग रील, हाय बार यात ३ सुवर्ण तर पोमेल हॉर्स, फ्लोअर एक्झरसाइज, टेबल व्हॉल्ट यांत तीन रौप्य पदके पटकावली. चौहान कुटुंब छोट्या घरात राहते. पालकांनी त्याची आवड हेरली. कोचकडे पाठविले. विहानने मुंबईतील स्पोर्ट्स स्पार्क क्लबमधून प्रशिक्षक आशिष चिकेरूर यांच्याकडून जिम्नॅस्टिकचे धडे गिरवले. राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी केली होती.
मी घरकाम करते. आमची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्याचा जन्म झाला तेव्हा तर विहान ७०० ग्रॅम वजनाचा होता. आता तो थायलंडमध्ये होता, तेव्हा भूकंप झाला. त्याची काळजी लागली होती. त्याच्या यशामुळे बरे वाटते.किरण चौहान, विहानची आई मुंबईत ६० बालकांमध्ये विहान निवडला गेला. तो रोज १ तास सराव करायचा. त्याच्याकडे चिकाटी खूप आहे. म्हणून त्याने बँकॉक येथे चांगली कामगिरी केली.अभिषेक चिकेरूर, विहानचे प्रशिक्षक