पाटलांना मोदींवर भरोसा नाय काय? राष्ट्रवादीच्या मलिक यांची तिखट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 08:30 PM2019-04-17T20:30:48+5:302019-04-17T20:30:53+5:30
लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय होणार की नाही याबाबत दोघांच्या मनात शंका आहे.
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हे दोघेही भाजपाच्या वर्तुळात दिसतात. पण भाजपामध्ये अधिकृत प्रवेश करत नाहीत. याचे कारण स्पष्ट आहे की, राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा पंतप्रधान मोदींवर भरोसा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय होणार की नाही याबाबत दोघांच्या मनात शंका आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना भाजपामध्ये पाठवले मात्र, स्वतः भाजपात पक्ष प्रवेश केला नाही, अशी तिखट प्रतिक्रिया मलिक यांनी दिली. मोदींच्या अकलुज येथील सभेत विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थित होते, त्यावर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक यांची ही प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखेपाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न उद्धभव आहे. पाटलांना मोदींवर भरोस नाय काय? असंच राष्ट्रवादीला वाटत असल्याचंही स्पष्ट होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अकलूज (ता. माळशिरस) येथे सभा घेतली. त्यावेळी, शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. शरद पवार निवडणुकीच्या मैदानात ओपनिंग बॅटसमन म्हणून आले, परंतु बारावा गडी म्हणून न खेळताच बाहेर पडले, अशा शब्दात मोदींनी माढा लोकसभा मतदारसंघातील पवारांच्या माघारीची खिल्ली उडवली. तसेच, सोलापूर जिल्ह्यातील नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील यांचे कौतुकही केले.