विविध विषयांवर ठाकरे-दर्डा यांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 05:12 AM2019-02-02T05:12:15+5:302019-02-02T05:16:31+5:30
तासभर चाललेल्या भेटीत राज्यातील व देशभरातील राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांची शुक्रवारी मातोश्री येथे भेट झाली. तासभर चाललेल्या भेटीत राज्यातील व देशभरातील राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. या वेळी लोकमतचे संपादकीय आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डाही उपस्थित होते.
विजय दर्डा यांनी त्यांचे नातू आर्यमन देवेंद्र दर्डा याने लिहिलेल्या ‘स्नो फ्लेक्स’ या इंग्रजी कवितासंग्रहाची प्रत उद्धव ठाकरे यांना भेट दिली. केवळ १६ व्या वर्षी आर्यमनने केलेल्या आगळ्या कवितासंग्रहाचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. आपला मुलगा आदित्य यानेही असाच कवितासंग्रह लिहिला असल्याचे सांगितले. तो संग्रह बाळासाहेबांना आवडल्यामुळेच तो पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या यवतमाळच्या घरी दिलेल्या भेटीच्या आठवणींनाही विजय दर्डा यांनी उजाळा दिला. केवळ बाळासाहेबांच्या प्रेरणेमुळेच आपण खासदार झाल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. जवाहरलाल दर्डा आणि बाळासाहेब यांचे मैत्रीचे संबंध होते. पक्षापलीकडे जाऊन त्यांनी हे संबंध शेवटपर्यंत टिकवले होते, असेही विजय दर्डा म्हणाले.
हजरजबाबी उद्धव
या सदिच्छा भेटीदरम्यान विजय दर्डा यांनी फुलांची व फळांची करंडी भेट देत, यातील सगळे काटे काढून टाकले आहेत, असे विनोदाने सांगितले. तेव्हा, मी ती करंडी काटेकोरपणे पाहून घेईन, अशी नर्मविनोदी टिप्पणी उद्धव यांनी केली आणि सारे जण हास्यकल्लोळात बुडून गेले.