Join us

विजय दर्डा यांनी व्यक्तिगत भूमिका लिखाणात कधीही आणली नाही, सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:16 IST

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांना कै. काकासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान

मुंबई : आपल्या लिखाणातून कोणताही विषय मांडताना आपले व्यक्तिगत मत किंवा भूमिकेची सरमिसळ त्यांनी कधी केली नाही. त्यामुळेच कधी नफातोट्याचाही विचार केला नाही, अशा शब्दांत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. 

ज्येष्ठ संपादक कै. काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान व आचार्य अत्रे समिती, मुंबई यांच्यातर्फे पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा ज्येष्ठ संपादक कै. काकासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉ. विजय दर्डा यांना मंत्री शेलार यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, मनसे नेते बाळा नांदगावकर, ज्येष्ठ संपादक कै. काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान व आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा ॲड. आरती पुरंदरे सदावर्ते, माजी आमदार कांता नलावडे, प्रा. विसूभाऊ बापट, प्रा. उमा बापट, विश्वस्त विजय कदम, रवींद्र अवटी, ॲड. बिना पै आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी यांनी केले. 

डॉ. दर्डा यांनी राम मंदिराचा निर्णय झाल्यानंतर लिहिलेला लेख हा काँग्रेसी विचारांचे असल्यानंतरही त्या निर्णयाचे खरे विश्लेषण करणारा होता, अशी आठवणही शेलार यांनी सांगितली. आचार्य अत्रे यांचे पट्टशिष्य असलेल्या काकासाहेब पुरंदरे यांनी कामगार, शेतकरी, मजुरांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ. विजय दर्डा यांची निवड अत्यंत योग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

लोकमत समूहाचे प्रमुख म्हणून नाही तर सामाजिक भान असलेले ज्येष्ठ पत्रकार म्हणून डॉ. विजय दर्डा यांची निवड महत्त्वाची आहे, असे साहित्यिक रामदास फुटाणे यांनी नमूद केले. फुटाणे यांनी कविता सादर करून राजकीय फटकेबाजीही केली. पत्रकारितेच्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान होत आहे ही आनंदाची बाब आहे, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. विसूभाऊ बापट आणि उमा बापट यांच्या ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या कार्यक्रमाने झाली. पुरस्कार प्रदान सोहळ्यात गेल्या २५ वर्षांपासून १४ हजार गरजू आणि वृद्ध कलाकारांसाठी कार्य करणाऱ्या मराठी व्यावसायिक वाद्यवृंद कलाकार आणि निर्माता संघ, कलानिधी समिती यांचा सन्मान मंत्री शेलार यांनी केला. प्रा. विसूभाऊ बापट आणि उमा बापट, तसेच ३२ वर्षे आषाढी वारीत आणि नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यात वैद्यकीय सेवा देणाऱ्या माउली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट यांचाही सन्मान मंत्री शेलार यांनी केला.  

‘पत्रकारिता परमो धर्म’आज लोकमत समूह या उंचीवर पोहचला, त्यामागे जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजींनी आखून दिलेली रेषा आहे. त्यांनी पत्रकारितेची बांधिलकी जपण्यास सांगितले. लोकांना अडचण असेल तिथे पत्रकारितेने काम केले पाहिजे हे तत्त्व दिले होते. त्यांनी दाखविलेल्या ‘पत्रकारिता परमो धर्म’ या तत्त्वानुसार लोकमत काम करत राहिला आहे. त्यातूनच एका जिल्ह्यातून आलेले लोकमत वृत्तपत्र देशात नंबर एकवर पोहचले आहे, असे पुरस्कार स्वीकारताना डॉ. विजय दर्डा यांनी सांगितले. हा केवळ माझा सन्मान नाही, तर संपूर्ण पत्रकारितेचा सन्मान आहे. आमची तिसरी पिढी पत्रकारितेत असून ती कायमच सामान्यांबरोबर राहील, असा विश्वासही डॉ. दर्डा यांनी दिला. 

टॅग्स :विजय दर्डाआशीष शेलार