विजय मल्याच्या जप्त विमानाच्या पार्किंगचाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:07 AM2018-06-18T05:07:12+5:302018-06-18T05:07:12+5:30
किंगफिशर विमान कंपनीचे मालक विजय मल्ल्या यांचे खासगी विमान जप्त करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किं गमध्ये ठेवण्यात आले आहे.
मुंबई : किंगफिशर विमान कंपनीचे मालक विजय मल्ल्या यांचे खासगी विमान जप्त करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किं गमध्ये ठेवण्यात आले आहे. हे विमान गेल्या ५ वर्षांपासून एकाच जागी ठेवण्यात आले असल्याने ते वापर करण्याच्या परिस्थितीत नाही. मात्र, देशाला हजारो कोटी रूपयांचा चुना लावून देशाबाहेर पसार झालेल्या मल्ल्याच्या जप्त केलेल्या विमानाच्या पार्किंगचा देखील फटका प्रशासनाला बसत आहे.
सेवा कर विभागाने मल्ल्याचे हे विमान २०१३ मध्ये जप्त करून विमानतळाच्या पार्किंग मध्ये ठेवले आहे. ही सरकारी कारवाई असल्याने विमानतळाला या विमानाच्या पार्किंगबाबत काहीही भाडे मिळत नाही. प्रत्यक्षात विमानतळावर या विमानाच्या आकाराएवढे विमान पार्क करायचे असल्यास एका तासासाठी किमान १० ते १५ हजार रूपये आकारले जातात, अशी माहिती सुत्रांनी दिली. गेल्या पाच वर्षांपासून हे विमान पार्क करण्यात आल्याने विमानतळ प्रशासनाला कोट्यवधी रूपयांचा फटका बसत आहे. या विमानाचा लिलाव करण्याचा यापूर्वी प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने हे विमान अद्याप त्याच जागी उभे आहे. हे विमान आता उड्डाण करण्याच्या परिस्थितीत नसल्याने त्याला केवळ भंगारात काढणे हाच पर्याय शिल्लक राहिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.