मुंबई : गिरणगावातील सांस्कृतिक इतिहास आणि वारसा जमीनदोस्त करू पाहणाऱ्या प्रवृत्तींचा शांततापूर्ण जाहीर निषेध करत दामोदर हॅालच्या प्रवेशद्वारासमोर रंगकर्मींनी आंदोलन केले. या आंदोलनात मराठी नाट्यकर्मींसोबत दामोदर नाट्यगृहातील कर्मचारी आणि सहकारी मनोरंजन मंडळाने सहभाग घेतला. हे नाट्यगृह वाचविले पाहिजे. त्यासाठी पुनर्विकासाची लेखी हमी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी केली.
दामोदर हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ रंगकर्मींसोबतच नाट्यरसिकही जमा झाले आणि घोषणा देत आंदोलन सुरू झाले. यावेळी पाटकर, ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते, दिग्दर्शक हेमंत भालेकर, राजेश नर तसेच बरेच रंगकर्मी उपस्थित होते.
हेमंत भालेकर म्हणाले की, मनोरंजन नसेल तर तुम्ही सगळे मानसिक रुग्ण व्हाल. माणसांची यंत्रे बनवायची नसतील तर नाट्यगृहे सुरू राहिली पाहिजेत. सरकारने यात लक्ष घालून तातडीने दामोदर हॉल संदर्भातील प्रश्न सोडवावा. नव्या प्लॅनमध्ये साडेपाचशे आसनक्षमतेचे थिएटर आहे, ज्याचा नाटकाला काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे हा हॉल भविष्यात कॉर्पोरेट सभांसाठी दिला जाईल.
यावेळी सर्व रंगकर्मींच्या मनातील खंत व्यक्त करत पाटकर म्हणाले की, जिथून आमच्यासारख्या असंख्य कलाकारांची सुरुवात ही पत्र्याच्या शेडपासून झाली त्या दामोदर हॉलच्या बाहेर आंदोलन करण्याची वेळ यावी, यासारखे दुर्दैव नाही.
तुम्ही शाळा बांधा; पण आमचे हे मंदिरही बांधून द्या. क्षेत्रफळ किती देणार, या सर्व गोष्टी लेखी स्वरूपात द्या. आम्हाला शाब्दिक आश्वासन नको. एखाद्या चित्रपटगृहाची नवीन इमारत सरकारी मान्यता मिळाल्याशिवाय बांधता येत नाही. असे असतानासुद्धा दामोदर हॉल हा मराठी माणसासाठीचा रंगमंच नेस्तनाबूत करण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा थेट सवाल राजेश नर यांनी शासनाला केला आहे.