मुंबई - शिवसेना शिंदे गटातील नेते आणि माजी आमदार विजय शिवतारेंचे बंड थंड झाल्यानंतर आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने बोंबाबोंब करुन शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. आता, त्याच बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्यांच्या प्रचारासाठी विजय शिवतारेंनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. शिवतारेंच्या पुरंदरमध्ये आज महायुतीची समन्वय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासाठी शिवतारेंचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थिती दर्शवणार आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी महायुतीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला माजी मंत्री आणि अजित पवारांचे विरोधक राहिलेले विजय शिवतारे उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांचे कार्यकर्ते या समन्वय बैठकीला हजर राहणार आहेत. मुंबईत असल्याने आजच्या बैठकीला शिवतारे नसतील, पण त्यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा आजच शुभारंभ झाल्याचे यावरुन दिसून येते. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांनी विजय शिवतारेंची समजूत काढल्यानंतर त्यांचे बंड थंड झाले होते. शिवतारेंच्या या भूमिकेवरून एक निनावी पत्र व्हायरल झालं. त्यात महाराष्ट्राचा पलटूराम म्हणून शिवतारेंना डिवचण्यात आलं. हे पत्र शिवतारेंच्या कार्यकर्त्याने लिहिल्याचं सांगण्यात येत होते. परंतु त्यावर कुणाचेही नाव नव्हते. मात्र, विजय शिवतारेंच्या बदलत्या भूमिकेवरुन आता त्यांच्यावर टीका होत आहे.
विजय शिवतारेंनी बंड थंड केल्यानंतरही प्रतिक्रिया दिली असून आता ते थेट सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसून येईल. ज्यांच्याविरुद्ध पुकारले होते बंड, त्यांच्या प्रचाराचा शिवतारे करतील शुभारंभ असेच चित्र आजच्या ढुमेवाडी येथील महायुतीच्या समन्वय बैठकीतून दिसून येत आहे.
बंडानंतर दिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मी न लढण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्याआधी आमचे नेते खतगावकर यांचा फोन आला होता. त्यांनी समजावले की, तुमच्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत येतील. अशा प्रकारे सर्वत्र अपक्ष उभे राहीले तर १० ते २० खासदार पडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठ्या विजयाने पुन्हा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपण न लढण्य़ाचा निर्णय घेतल्याचे शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
दरम्यान, विजय शिवतारे यांनी अजित पवांरांविरुद्ध दंड थोपटले होते. काहीही झालं तरी बारामती लोकसभा मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्यानंतरही मी प्रसंगी शिवसेनेतून बाहेर पडेल, पण निवडणूक लढवणार आणि बारामतीमधून पवारांच्या घराणेशाहीला विरोध करणार असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं होतं. तर, बारामतीचा सात-बारा त्यांच्या नावावर नाही, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी पलटी मारत आपले बंड थंड केले.