मुंबई - बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर करीत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी दोन दिवस सबुरीचे धोरण बाळगणार असल्याचे स्पष्ट केले. विजय शिवतारेंनी अजित पवारांविरुद्ध दंड थोपटले होते, आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणाही केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंची भूमिका मवाळ झाल्याचं दिसून येत आहे.
बारामतीमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान शिवतारे यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवतारे यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर गुरुवारी तब्बल सात तास ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी ताटकळले होते. याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबणं ही बातमी नाही, माझी मुख्यमंत्र्यांसोबत दीड तास चर्चा झाली आहे. त्यानुसार, या चर्चेनंतर मी दोन दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे, काय असेल ते पुढे पाहता येईल, असेही शिवतारेंनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवतारेंना २ दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय महायुतीत ज्याला उमेदवारी मिळते, त्याच्यासाठी काम करायचं, अशी समजही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बारामतीमधील नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हाधिकारी, तालुकाप्रमुख यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीत मुख्यमंत्र्यांना मतदारसंघात असणारा त्रास त्यांना सांगितला. आता त्यांनी संबंधितांशी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे.