लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर करीत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी दोन दिवस सबुरीचे धोरण बाळगणार असल्याचे स्पष्ट केले.
बारामतीमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान शिवतारे यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवतारे यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर गुरुवारी तब्बल सात तास ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी ताटकळले होते.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बारामतीमधील नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हाधिकारी, तालुकाप्रमुख यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीत मुख्यमंत्र्यांना मतदारसंघात असणारा त्रास त्यांना सांगितला. आता त्यांनी संबंधितांशी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे.