मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारापासून नाराजीनाट्याच्या अनेक बातम्या येताना पाहायला मिळत आहेत. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना दुय्यम दर्जाची खाती दिल्याने ते नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळेच अद्याप वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाही तसेच मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी मारली. याबाबत उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी खुलासा केला आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, विजय वडेट्टीवार नाराज नाही. त्यांच्याबाबत एक चूक झाली आहे. वडेट्टीवारांना देण्यात आलेल्या खात्यामध्ये मदत पुनर्वसन ऐवजी भूकंप पुनर्वसन खातं दिलं गेले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ते बदलून देण्याबाबत आश्वासन दिलं आहे. मदतऐवजी भूकंप झाला त्यामुळे वडेट्टीवार नाराज असतील. प्रिटींग मिस्टेक यापूर्वी अनेकदा झाल्या आहेत. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना काही गोष्टी अनावधाने घडतात. नजीकच्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील असं त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक घेतली यावेळी पवारांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केले. पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या यादीच्या आधारे जिल्ह्याचं पालकत्व दिलं जाईल. तासाभरात पालकमंत्र्यांबाबत घोषणा होऊ शकते. मंत्री आणि संघटना यांच्यात समन्वय असावा यासाठी बैठक झाली असंही अजित पवारांनी सांगितले. त्याचसोबत जवळच्या आमदारांना सांगण्यासाठी दिलासा द्यावा लागतो की आपलं सरकार येणार आहे. लोकांना अच्छे दिन येणार स्वप्न दाखवलं तसं आमदारांना आपलं सरकार येणार हे स्वप्न दाखवलं जात असावं असा टोला अजित पवारांनी भाजपाला लगावला.
अशोक चव्हाण आणि माझ्यात भांडण नाही. अशोक चव्हाण आणि माझ्यात कधीही भांडण झालं नाही, त्यांनी फोन करुन मला विचारलं आपण भांडलो कधी? कोणाला बैठकीतून आधी निघायचं असेल तर ते निघतात मग तुम्ही बातम्या देतात कायतरी बिनसलं. सभागृहातही प्रोटोकॉलप्रमाणे जागा दिल्या तसे बसले होते. मंत्रिमंडळात खुर्च्यावरुन वाद झाला या सगळ्या अफवा आहेत असंही अजित पवारांनी स्पष्ट करत माध्यमांनी शहानिशा करुन बातम्या द्याव्यात ही विनंती केली.