Join us  

विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण बहुमत चाचणीला मुकले; सभागृहात उशीरा पोहोचले, दरवाजे बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 11:43 AM

राज्याच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारची बहुमत चाचणी घेण्यात येत आहे. रविवारी शिंदे सरकारनं पहिली लढाई जिंकत भाजपाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले.

मुंबई-

राज्याच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारची बहुमत चाचणी घेण्यात येत आहे. रविवारी शिंदे सरकारनं पहिली लढाई जिंकत भाजपाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले. पण आजचा दिवस शिंदे सरकारसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करायचं आहे. जितकं शिंदे सरकारसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे तितकाच तो विरोधी पक्षांसाठी आहे. कारण आपल्याकडे बहुमत नसलं तरी प्रत्येक मताची किंमत अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे अशा महत्वाच्या क्षणी वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं ठरतं. पण आज काँग्रेसच्या लेटलतीफ आमदारांमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे पाच आमदार आज बहुमत चाचणीला वेळेवर उपस्थित न राहिल्यानं त्यांना मतदानाला मुकावं लागलं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचाही समावेश आहे. 

शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीचे LIVE UPDATES येथे क्लिक करा

राज्याच्या विधानसभेच्या आजच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. शिंदे सरकारचा विश्वासदर्शक ठराव हा एकच अजेंडा आजच्या कार्यक्रमात असल्यामुळे सभागृहाचं कामकाजाची सुरुवात विश्वासदर्शक ठरावानं झाली. विधानसभा अध्यक्षांनी बहुमत ठराव मांडला आणि यावेळी आमदारांची शिरगणती करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. यावेळी शिरगणती सुरू होण्याआधी दोन वॉर्निंग बेल दिल्या जातात. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे आतून बंद करण्यात येतात. पण काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाचे दारबंद झाल्यानंतर विधानभवनात पोहोचले. त्यामुळे या आमदारांना बहुमत चाचणीच्या मतदानाला मुकावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप देखील उशीरा पोहोचले. त्यामुळे त्यांनाही मतदान करता आलेलं नाही. 

टॅग्स :अशोक चव्हाणविजय वडेट्टीवारकाँग्रेस