“अतिवृष्टीमुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान, केंद्राने ७ हजार कोटी मदत द्यावी”; वडेट्टीवारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 04:54 PM2021-09-28T16:54:44+5:302021-09-28T16:57:00+5:30
विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीमुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून, केंद्र सरकारने महाराष्ट्राला ७ हजार कोटींची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
मुंबई: यंदाच्या मॉन्सून कालावधीत राज्याला पावसाने पुरते झोपडून काढल्याचे पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक आलेल्या चक्रीवादळामुळेही हजारो नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. याशिवाय शेतकरी बांधवांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यानंतर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीमुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून, केंद्र सरकारने महाराष्ट्राला ७ हजार कोटींची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. (vijay wadettiwar demands 7 thousand crore for the state from centre over heavy rain)
अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, परभणी अशा सर्वच जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात शेती पाण्याखाली गेलीय. तर सोयाबीनसह ऊस पिकांचे भरुन न येणारे नुकसान झाल आहे. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. विजय वडेट्टीवार यांनी मराठवाड्यात नुकसानाची पाहणी केली आणि यावेळी बोलताना केंद्राने महाराष्ट्राला मदत द्यायला हवी, असे म्हटले आहे.
महाराष्ट्राला ७ हजार कोटींची मदत केंद्राने करावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला तातडीने १ हजार कोटी रुपयांची मदत दिली. त्या पद्धतीने महाराष्ट्रातील नुकसान पाहता राज्याला किमान ७ हजार कोटींची मदत केंद्र सरकारने करावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना आम्ही भेटणार आहोत. मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय चर्चेला येणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचे रूपांतर आता अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. परिणामी राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला. विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद याठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्येही ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगावात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.