मुंबई- दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गट आणि ठाकरे गटाने उच्च न्यायालयात आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तीवाद केला.
शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच 'आवाssज'; 'शिवतीर्था'वर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी
न्यायालयाने तुमचा युक्तीवाद मर्यादेत ठेवा, निर्णयही द्यायचा आहे, असे तिन्ही बाजुंना सांगितले. या युक्तीवादानंतर न्यायालयाने शिवाजीपार्कवर दसरा मेळावा होणार? कोणत्या गटाचा होणार, यावर निर्णय दिला. ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात आली आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत, सत्यमेव जयते...आपला दसरा हा शिवतीर्थावरच, विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय, असं म्हटलं, तसेच सन्माननीय उच्च न्यायालयाचे त्यांनी आभार मानले आहेत.
कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतू दसरा मेळाव्याला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. माझ्या बहीणी आणि बंधूंनी आपल्या परंपरेला पुढे न्यायचे आहे म्हणून शिस्तीने वागावे. आमच्यावर कोणी बोट दाखविण्याची हिंमत करू नये, असे ठाकरे म्हणाले. शुभ बोल नाऱ्या सारखे वागुयात. विजया दशमीच्या दिवशी माझ्या आजोबांनी पहिला मेळावा घेतला होता. कोरोनाच्या काळातील अपवाद वगळता हा मेळावा आजवर नियमित झालेला आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडेल, अशी अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसैनिक जल्लोषात असताना मोठा ट्विस्ट; शिवाजी पार्कासाठी शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार!
दरम्यान, उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिकांमध्ये आताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे काही आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे, ते पाहता दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क अपुरं पडलं असतं, असा दावा शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे ज्या जागेची निवड करतील, त्या ठिकाणी आनंदात, भव्यदिव्य दसरा मेळावा संपन्न होईल, असा विश्वासही दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.
दसरा मेळावा गेली अनेक वर्षे होतोय-
न्यायालयाने शिवाजीपार्कवर दसरा मेळावा गेली अनेक वर्षे होतोय. सरकारने ४५ दिवस अशा कार्यक्रमांसाठी राखीव ठेवलेले आहेत, अशी टिप्पणी केली. तसेच सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर या निकालाचा परिणाम होणार नाही. ही याचिका फक्त शिवाजी पार्कची जागा दसरा मेळाव्यासाठी दिली जावी यावर आहे, असेही न्यायालयाने सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. पालिकेचा निर्णय हा वास्तविकतेला धरून नाही, पालिकेला परिस्थीती माहिती होती, असे मत न्यायालयाने नोंदविले. तसेच दादर पोलिसांचा अहवाल मान्य होण्यासारखा आहे, असेही न्यायालय म्हणाले.