दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाविकास आघाडीत जवळपास एक महिन्यापासून सुरू असलेल्या जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नसल्याने जागा वाटप जाहीर करण्याचा विजयादशमीचा मुहूर्त मुहूर्त टळणार आहे. मविआतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२० जागांचे वाटप निश्चित झाले आहे. उर्वरित ६८ जागांचा तिढा सोडविण्यासाठी दसऱ्यानंतर बैठक होईल.
येत्या शनिवारी दसऱ्याच्या मुहुर्तावर जागा वाटप जाहीर करण्याचा मविआचा प्रयत्न होता. त्यादृष्टीने सोमवार ते बुधवार अशा सलग तीन दिवस झालेल्या बैठकांमध्ये जागा वाटप पूर्ण करायचे ठरले होते. १५-२० जागांचा तिढा राहिला तर पक्षश्रेष्ठींकडे विषय पाठवून उर्वरित जागा वाटप जाहीर करायचे असे मविआ नेत्यांनी ठरविले होते. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर उद्धवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने जागा वाटप रखडल्याचे सांगितले जाते.
विदर्भात काँग्रेसचा दावा
ठाणे, पालघर जिल्ह्यातील जागा वाटपात कोणताही तिढा नाही. मात्र उर्वरित महाराष्ट्रात, त्यातही विदर्भ आणि मुंबईतील अनेक जागांवर निर्णय व्हायचा आहे. मुंबईतील ३६ पैकी अजून ८ जागांचा तिढा कायम असल्याचे मविआतील एका नेत्याने सांगितले.
विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक जागा हव्या आहेत. अहेरी मतदारसंघातील अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव आत्राम यांची कन्या भाग्यश्री यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने त्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा असताना काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितल्याचे समजते.
सोमवारी पुन्हा होणार चर्चा
मविआतील एका नेत्याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, २२० जागांची आमची चर्चा पूर्ण झाली आहे. उरलेल्या जागांपेैकी काही जागांवर काँग्रेस-उद्धवसेना, काँग्रेस-शरद पवार गट, शरद पवार गट-उद्धवसेना अशा दोन - दोन पक्षांनी दावा सांगितल्याने त्याची चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. सोमवारी आमची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे.