मुंबई : अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी अशी ओळख असणारे वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहतील. त्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी काढण्यात आले. या पदासाठी अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नावाची चर्चा असताना खारगे यांची निवड झाली आहे.
भूषण गगराणी हे देखील मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून सध्या कार्यरत आहेत. गगराणी १९९० च्या तर खारगे १९९४ च्या बॅचचे आहेत. मुख्यमंत्री कार्यालयासाठी आता १ अतिरिक्त मुख्य सचिव, २ प्रधान सचिव आणि १ सचिव अशी चार आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदे असतील. त्यानुसार दोन प्रधान सचिवांची पदे भरली गेली आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्री कार्यालयात येतील, अशी चर्चा आहे, पण त्यांचे आदेश अद्याप निघालेले नाहीत. मुख्य सचिव अजोय मेहता यांना ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून ती मुदत मार्च २०२० पर्यंत आहे. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार संजयकुमार यांची निवड होणे अपेक्षित आहे.
मेहता आणि संजयकुमार हे १९८४ च्या बॅचचे आहेत. संजयकुमार २८ फेब्रुवारी २०२१ रोजी निवृत्त होतील. त्यांना ११ महिने हे मुख्यसचिव पद मिळेल.त्यानंतर मुख्य सचिवपदासाठी सध्या सामान्य प्रशासन विभाग सांभाळणारे कुंटे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते. हे दोघेही १९८५ च्या बॅचचे असून मुख्य सचिव झाल्यास त्यांना फक्त ९ महिने मिळू शकतील.माहिती व तंत्रज्ञानाचे संचालक अमोल येडगे यांची अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून तर नंदुरबारच्या सरदार सरोवर प्रकल्पाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी के. एच. बागटे यांची बदली रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
कुर्वे यांची बदली
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील सचिव कुर्वे यांची बदली आता एमएडीसी येथे एमडी म्हणून केली आहे. राष्ट्रपती राजवट असताना कुर्वे यांना राजभवनावर बदली केली होती.औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त विनायक निपूण हे दीर्घकालीन रजेवर होते. त्यांना संचालक, मनपा प्रशासन या जागी पाठवण्यात आले आहे. तर ‘नीट’ च्या परिक्षेत झालेल्या गोंधळानंतर वादात सापडलेल्या आनंद रायते यांना सह आयक्त विक्रीकर विभाग येथे पाठवण्यात आले आहे.