Join us

विक्रोळी रेल्वे स्थानक : गर्दीचे व्यवस्थापनच गुदमरतेय! अरुंद पूल, निखळलेल्या लाद्या, असुविधांमुळे प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:55 AM

एल्फिन्स्टन दुर्घटनेचा प्रवाशांनी धसका घेतल्यानंतरही रेल्वे प्रशासन मात्र गंभीर नसल्याचे चित्र आहे. मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे

कुलदीप घायवट मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेचा प्रवाशांनी धसका घेतल्यानंतरही रेल्वे प्रशासन मात्र गंभीर नसल्याचे चित्र आहे. मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे पडत असून, येथील सेवासुविधाही तोकड्याच आहेत. पुलांवरील पत्रे तुटलेले असून, जिने अरुंद आहेत. स्वच्छता येथे नावापुरतीदेखील नाही. पुलांवरील लाद्या खराब झाल्या आहेत. गर्दीचे नियोजन करण्यात न आल्याने एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना घडू शकते, अशी भीती प्रवाशांना सतावत आहे.विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या छपरावरील पत्रे अत्यंत जुने झाले असून, मोडकळीस आले आहेत. गळक्या पत्र्यांमुळे पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होतात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बैठक व्यवस्था मोडकळीस आली आहे. दोन स्वयंचलित जिन्यांची गरज असताना एकच स्वयंचलित जिना आहे. अपंग, रुग्णांसाठी रॅम्पची सुविधा नाही. विक्रोळी पूर्व-पश्चिम पुलांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. स्थानकांवर अनधिकृतरीत्या फेरीवाले बसतात. चिंचोळ्या भागात मासळी बाजार आहे. परिणामी, येथील रहदारीला त्याचा फटका बसत आहे. वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन होत नाही. ऐन सकाळी आणि सायंकाळी झालेली गर्दी आवरता आवरत नाही. अनेकदा येथे रेल्वे पोलीस नसल्याने गर्दीला ताळमेळ राहत नाही. पुलासह फलाटावर पोलिसांची गरज असताना येथे त्यांचा अभाव दिसून येतो.जिन्यांचे काम रखडलेविक्रोळी स्थानकाच्या एक फलाटाच्या बाहेर जात असलेल्या रस्त्यामध्येच, एमएमआरडीने स्कायवॉकच्या जिन्यांचे काम अर्धवट सोडले आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा वापर करता येत नाही. गर्दीच्या वेळी या अर्धवट बांधकामाचा त्रास होतो. एमएमआरडीने स्कायवॉकचे काम पूर्ण तरी करावे किंवा या अर्धवट उभारलेल्या जिन्याला पाडावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.सूचना, तक्रारी, व्हिडीओ : ‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा -हास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास ८८४७७४१३०१ या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात. - कार्यकारी संपादक

टॅग्स :आता बासमुंबई लोकल