Join us

Vikhroli Vidhan Sabha Election Result 2024 Live : विक्रोळीत पुन्हा एकदा राऊतांचीच हवा, हॅटट्रिक साधणार?; ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:37 IST

Vikhroli Assembly Election 2024 Result Live Updates: विक्रोळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत, शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे आणि मनसेचा उमेदवार विश्वजीत ढोलम यांच्यात लढत आहे.

Vikhroli Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून महाविकास आघाडीची पिछेहाट झाल्याचं दिसून येत आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी १९४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांची आघाडी आहे तर ८६ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. या निवडणुकीत इतरांना ८ तर मनसे, वंचित बहुजन आघाडी यांना एकाही जागेवर आघाडी नाही. 

विक्रोळी मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. विक्रोळीतशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत, शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे आणि मनसेचा उमेदवार विश्वजीत ढोलम यांच्यात लढत आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा राऊतांचीच हवा पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे सुनील राऊत हे दहाव्या फेरीनंतर आघाडीवर आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha Results 2024

सुनील राऊत यांना ३७७९० मतं, सुवर्णा करंजे यांना २७१७२ मतं आणि विश्वजीत ढोलम यांना ११६१५ मतं मिळाली आहेत. सुनील राऊत यांनी शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर सुवर्णा करंजे यांच्या प्रचारासाठी विक्रोळीत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.  

महायुतीत भाजपा १०९, शिवसेना ५४ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३५ जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस २९, ठाकरे गटाला २८ आणि राष्ट्रवादीला २९ जागांवर आघाडी आहे. विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत. ऐरोलीत भाजपाचे गणेश नाईक आघाडीवर आहेत. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आघाडीवर आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४विक्रोळीसुनील राऊतशिवसेना