Join us

“रमेश देव यांचं काम पाहतच आम्ही मोठे झालो, निर्मळ मनाचं व्यक्तिमत्त्व”: विक्रम गोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 10:23 PM

Ramesh Deo: रमेश देव यांनी आतापर्यंत जवळपास १८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

मुंबई: मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. रमेश देव यांच्या निधनामुळे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. सन २०१३ साली रमेश देव यांना ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राजश्री प्रोडक्शनच्या सन १९६२ साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही रमेश देव यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. 

रमेश देव यांचे काम पाहतच आम्ही मोठे झालो

मास्टर विवेक, रमेश देव आणि दारा सिंग यांना कोणतेही व्यसन कधीच नव्हते. साध्या सुपारीचेही व्यसन नव्हते. या सगळ्यांसारखी निर्मळ मनाची माणसे होणे नाही. रमेश देव यांचे काम पाहातच आम्ही मोठे झालो. रमेश देव यांच्यासोबतही काम केले. रमेश देव आणि माझे खूप जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अतिशय दुःख झाले, असे विक्रम गोखले यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

दरम्यान, रमेश देव यांनी आतापर्यंत जवळपास १८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सन १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. सन १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.  

टॅग्स :सेलिब्रिटीरमेश देवविक्रम गोखले