दूषित पाण्यामुळे विक्रोळीकर हैराण

By जयंत होवाळ | Published: April 2, 2024 07:50 PM2024-04-02T19:50:32+5:302024-04-02T19:50:49+5:30

बांधकामांमुळे वाहिन्या सतत फुटत असून त्यावरही कोणत्या यंत्रणेचा वचक नसल्याचे दिसून येत आहे.

Vikrolikar shock due to contaminated water | दूषित पाण्यामुळे विक्रोळीकर हैराण

दूषित पाण्यामुळे विक्रोळीकर हैराण

मुंबई :  बांधकामांमुळे फुटणाऱ्या जलवाहिन्या आणि मलनिःसारण वाहिन्या आणि त्यामुळे होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे विक्रोळी कन्नमवार नगर मधील नागरिक अक्षरशः  हैराण  झाले असून त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका आणि म्हाडाकडून या गंभीर समस्येची म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे. गेला महिनाभर अनेक नागरिक बाटलीबंद पाणी वापरून दिवस ढकलत आहेत.  त्याशिवाय या भागात सुरु असणाऱ्या बांधकामांमुळे वाहिन्या सतत फुटत असून त्यावरही कोणत्या यंत्रणेचा वचक नसल्याचे दिसून येत आहे.

कन्नमवार नगरात सध्या पुनर्विकास जोरात आहे. त्यामुळे जुन्या इमारती पाडून  नव्या इमारतींची उभारणी सुरु आहे. रस्त्यांची कामे सुरु आहेत. ही कामे सुरु असताना सातत्याने जलवाहिन्या आणि मलनिःसारण वाहिन्या फुटत आहेत. त्यामुळे पिण्याच्या  पाण्यात मलनिःसारण वाहिन्यातील पाण्याची सरमिसळ होत आहे. पिण्याच्या पाण्याला उग्र दर्प येत असून चवही मातीसारखी आहे. अनेक नागरिक त्यामुळे पाणी उकळून पित  आहेत. दूषित पाण्यामुळे अतिसार आणि उलट्या असा त्रास जाणवणाऱ्या रुग्नांची संख्या खाजगी दवाखान्यात वाढत आहे. कन्नमवार नगर ही  म्हाडा वसाहत असल्याने अजून सेवा वाहिन्यांची  जबाबदारी म्हाडाकडून पालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे समस्या उध्दभवल्यास रहिवाशांना  या दोन्ही यंत्रणांकडे खेटे घालावे लागत  आहेत.


इमारत क्रमांक १ ते प्रवीण हॉटेल दरम्यान अनेक इमारतींचा पुनर्विकास सुरु आहे. इमारत क्रमांक १४ आणि आसपासच्या इमारतीतील रहिवासी तर सतत फुटणाऱ्या वाहिन्यांमुळे त्रासले आहेत. गेले महिनाभर या ठिकाणी दूषित  पाण्याची समस्या अधूनमधून जाणवत आहे. फुटलेल्या जलवाहिन्या म्हाडाचे कर्मचारी येऊन दुरुस्त करतात. पण पुन्हा काही दिवसांनी कुठे ना कुठे वाहिनी फुटते असे प्रकार सातत्याने सुरु आहेत.


दूषित पाण्यामुळे अनेक रहिवासी बाटलीबंद पाणी  वापरत आहेत. ''आम्ही गेले महिनाभर  रोज १०० रुपये खर्चून २० लिटरचा पाण्याचा बाटला वापरत आहोत. पाण्याला उग्र वास येत असल्याने  चूळ भरण्यासाठीही पाणी तोंडात घ्यावेसे वाटत नाही'', असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.  

Web Title: Vikrolikar shock due to contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई