विलेपार्ले पोलिसांनीही निभावलं ‘रक्ताचं नातं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:05 AM2021-07-22T04:05:52+5:302021-07-22T04:05:52+5:30
मुंबई : विलेपार्ले पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत दोन महिन्यांपूर्वी ‘रक्ताचं नातं’ निभावत ६४८ बाटल्या रक्त संकलन केले. त्यांच्या या ...
मुंबई : विलेपार्ले पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत दोन महिन्यांपूर्वी ‘रक्ताचं नातं’ निभावत ६४८ बाटल्या रक्त संकलन केले. त्यांच्या या उपक्रमाबाबत सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांची पाठ थोपटत प्रशंसा केली आहे.
विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र श्रीमंधर काणे यांनी ट्रस्ट, मंडळ तसेच पार्लेकर पोलीस मित्र अशा ४१ संस्थांच्या मदतीने ९ मे, २०२१ रोजी विलेपार्ले परिसरातील उत्कर्ष मंडळ हॉल या ठिकाणी अन्य सहकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये १५० महिला आणि ५५१ पेक्षा अधिक पुरुषांनी सहभाग घेत रक्तदान केले. त्यानुसार एकूण ६४८ बाटल्या रक्तपिशव्या गोळा करण्यात काणे यांच्या टीमला यश आले.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात महात्मा गांधी सेवा रुग्णालयाचे डॉ. किशोर झा आणि त्यांच्या टीमनेही सिंहाचा वाटा उचलला. “आपली कामगिरी ही प्रशंसनीय आणि उल्लेखनीय असून, त्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतो. तसेच भविष्यातही आपण अशीच चांगली कामगिरी कराल अशी अपेक्षा बाळगतो,” या शब्दांत नांगरे पाटील यांनी काणे आणि त्यांच्या टीमला शाबासकी दिली आहे.
रेकॉर्डब्रेक टार्गेट गाठल्याबाबत आभार
‘आम्ही किमान २०० बाटल्या रक्त संकलन करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले. मात्र जवळपास ४१ संस्था यात सहभागी झाल्या आणि आम्ही ६४८ बाटल्या गोळा करण्याचे रेकॉर्डब्रेक टार्गेट गाठत हे शिबिर यशस्वी करू शकलो यासाठी मी सर्व संस्था, मंडळे तसेच पार्लेकर पोलीस क्लबचे आभार मानतो.
- राजेंद्र काणे, पोलीस निरीक्षक, विलेपार्ले पोलीस स्टेशन.