सोमवारी चौकशीसाठी हजर राहावे लागणार; अद्याप कोणालाही अटक नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंची मुंबई पाेलिसांनी गुरुवारी कसून चौकशी केल्यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. त्यानुसार त्यांना साेमवारी चाैकशीस हजर राहावे लागेल.
परांजपे बंधूंवर गुरुवारी दुपारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाहून मुंबई पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. खोटी कागदपत्रे बनवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप वसुंधरा डोंगरे या महिलेने त्यांच्यावर केला आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४९२/२०२१ नुसार ४७६, ४६७, ६८, ४०६, ४२० आणि १२० (ब) या कलमांतर्गत श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे या बांधकाम व्यावसायिक असलेल्या परांजपे बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना मुंबईत आणल्यानंतर शुक्रवारी सलग १६ तासांहून अधिक काळ पोलिसांनी त्यांची चौकशी केली. मात्र या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘आम्ही त्यांना सोमवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहेत,’ अशी माहिती परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र, परांजपे बंधूंच्या चौकशीदरम्यान नेमकी कोणती माहिती मिळाली याबाबत माहिती देणे त्यांनी टाळले.
..............................................