विलेपार्ले पादचारी पुलाला गेले तडे, शिवसेनेने केली रेल्वे प्रशासनाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 09:31 PM2018-07-07T21:31:27+5:302018-07-07T21:34:15+5:30
विलेपार्ले पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा रेल्वे पादचारी पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून, या पुलाची अवस्था बिकट झाली आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- विलेपार्ले पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा रेल्वे पादचारी पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून, या पुलाची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या मंगळवारी गोखले पुलावर असलेला अंधेरी पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडून मुंबईची धमनी असलेली पश्चिम रेल्वेची वाहतूकच 12 ते 15 तास बंद पडली होती. तशीची दुर्घटना विलेपार्ले पादचारी पुलावर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेनेने या पुलाच्या दैनावस्थेबाबत आवाज उठवला असून, रितसर तक्रार आपण रेल्वे प्रशासनाकडे केली असल्याची माहिती शाखा क्रमांक 84 चे शाखाप्रमुख नितीन डिचोलकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
विलेपार्ले पूर्व व पश्चिमेला पार्लेकरांना जाण्यासाठी येण्यासाठी पूर्वी येथील आझाद रोडवर रेल्वे फाटक होते.पार्लेकर पूर्वी फाटक बंद असतांना ते ओलांडून पूर्व पश्चिम येजा करत होते. येथे फाटक असल्यामुळे फाटक उघड बंद करण्यात येत असल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेगाला ब्रेक लागत होता. त्यामुळे 12 वर्षांपूर्वी पार्लेकरांच्या सोयीसाठी येथे रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल बांधला.या पूलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून येथे विजेची जोडणी देखील उघडी आहे.
त्यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाचा उपयोग विशेष करून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांचे पालक जास्त करतात. अंधेरी पुलासारखी दुर्घटना येथे घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडे या पुलाची तक्रार करण्यात आल्याची माहिती डिचोलकर यांनी दिली.