Join us

‘टॅलेन्झिया’ नृत्य स्पर्धेला विलेपार्लेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:35 AM

विलेपार्ले पूर्वेकडील हनुमान रोड येथील न्यू एअरपोर्ट कॉलनीच्या मैदानात रॉकर्स डान्स अकादमीतर्फे ‘टॅलेन्झिया २०१८ सिझन २’ नृत्य स्पर्धा नुकतीच दिमाखात पार पडली

मुंबई : विलेपार्ले पूर्वेकडील हनुमान रोड येथील न्यू एअरपोर्ट कॉलनीच्या मैदानात रॉकर्स डान्स अकादमीतर्फे ‘टॅलेन्झिया २०१८ सिझन २’ नृत्य स्पर्धा नुकतीच दिमाखात पार पडली. नृत्य स्पर्धेत एकेरी, दुहेरी आणि समूह नृत्यांची फेरी सादर करण्यात आली. नृत्य स्पर्धेसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर येथून २५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांपैकी ५० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीत करण्यात आली. या वेळी नृत्यांच्या तालावर अनेक नर्तकांनी पार्लेकरांना मंत्रमुग्ध केले.

एकेरी, दुहेरी आणि समूह नृत्य स्पर्धांमध्ये दोन विभागांत विजेत्यांचे विभाजन करण्यात आले. एकेरी नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विदुला बंगर, द्वितीय क्रमांक पूर्वा सालेकर आणि कमलाक्षी जाधव, तृतीय क्रमांक प्राप्ती देसाई आणि हर्ष भंडारी यांनी क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक ओंकार मालवे, द्वितीय क्रमांक प्रशांत राहटे, तृतीय क्रमांक पराग कुंभार यांनी क्रमांक पटकावला.

दुहेरी नृत्य स्पर्धेत प्रथम प्रचिती-श्वेता, द्वितीय निखिल-आर्या, तृतीय क्रमांक हर्ष-मानसिंग यांनी पटकावला, तर प्रथम क्रमांक त्रिषा-राजेंद्र, द्वितीय राहुल-रूपेश, तृतीय महेश-गोविंद यांनी क्रमांक पटकावला. समूह नृत्यस्पर्धेत प्रथम क्रमांक एफएनएफसी क्रु, द्वितीय जीटूआरटू हॉरर, तृतीय सचिन डान्स अकादमी यांनी पटकावला, तसेच प्रथम क्रमांक फ्लाय हाय फॅमिली, द्वितीय एसआरएस मिरॅकल, तृतीय क्रमांक किसन कला मंच यांनी पटकावला.

तळागाळातल्या कलाकांराना मोठे व्यासपीठ मिळत नाही. या स्पर्धकांना चांगले व्यासपीठ मिळावे, या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला मुलांसह पार्लेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती टॅलेन्झिया २०१८ सिझन २च्या प्रमुख आयोजक स्मिती कदम यांनी दिली. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. टॅलेन्झिया २०१८ सिझन २ च्या प्रमुख आयोजक स्मिती कदम, सहआयोजक आशिष बीडलान, प्रशांत मारणे आणि आयोजक समिती अध्यक्ष रोहित देशमुख यांची विशेष मदत स्पर्धेला मिळाली.