पुस्तकांच्या गावात उद्या रंगणार वर्षपूर्ती सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 04:54 PM2018-05-02T16:54:19+5:302018-05-02T16:54:19+5:30

स्तकांचं गाव (भिलार) या अभिनव प्रकल्पास १ वर्ष पूर्ण होत असून, शुक्रवार ४ मे, २०१८ रोजी या निमित्त वर्षपूर्ती सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भिलार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे साजरा होत आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज दिली.

village of books Anniversary news | पुस्तकांच्या गावात उद्या रंगणार वर्षपूर्ती सोहळा

पुस्तकांच्या गावात उद्या रंगणार वर्षपूर्ती सोहळा

Next

 मुंबई - पुस्तकांचं गाव (भिलार) या अभिनव प्रकल्पास १ वर्ष पूर्ण होत असून, शुक्रवार ४ मे, २०१८ रोजी या निमित्त वर्षपूर्ती सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भिलार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे साजरा होत आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज दिली. खुल्या प्रेक्षागृहाचे (अॅम्फी थिएटर) उद्घाटन, शब्दचांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम, नव्या ५ दालनांचे (पुस्तक घरांचे) उद्घाटन, वर्षपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन आणि अनेक मान्यवर साहित्यिक, कलाकार यांची प्रकल्पास भेट असे विविध कार्यक्रम योजण्यात आल्याची माहिती श्री. तावडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पुस्तकांच्या गावात ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनास दिलेल्या जमिनीवर, सुमारे २००-२५० रसिक आरामात बसून कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतील, असे खुले प्रेक्षागृह (अॅम्फी थिएटर) बांधून पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने, निसर्गरम्य ठिकाणी बांधण्यात आलेल्या या प्रेक्षागृहाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते, दु. १२.०० वा. होणार आहे. गावातील श्रीराम मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या या खुल्या प्रेक्षागृहात सायं. ५.०० वा. शब्दचांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम योजण्यात आला असून विघ्नेश जोशी,निधी पटवर्धन, नचिकेत लेले, संदीप खरे, नंदेश उमप व कमलेश भडकमकर आदी दर्जेदार कलाकार हा साहित्य व वाचनसंस्कृती या विषयीचा सांगीतिक - साहित्यिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा, नाटक व चित्रपट, चित्रमय पुस्तकं, कादंबरी (दालन २) व चरित्रे - आत्मचरित्रे (दालन २) या नव्या ५ दालनांचा (पुस्तक घरांचा) शुभारंभ करण्यात येणार आहे. या प्रसंगी डॉ. सदानंद मोरे, श्री. भारत सासणे, डॉ. माधवी वैद्य, श्रीम. मोनिका गजेंद्रगडकर,   योगेश सोमण,  ल. म. कडू,  प्रदीप निफाडकर,   अतुल कहाते,   विश्वास कुरुंदकर,  किशोर पाठक,  विनायक रानडे आदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर पुस्तकांच्या गावास भेट देणार आहेत, अशीही माहिती  विनोद तावडे यांनी दिली.

हजारो पर्यटक - वाचकांच्या पसंतीस उतरलेले भारतातील पहिले पुस्तकांचे गाव, निसर्गरम्य खुल्या प्रेक्षागृहात दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवर साहित्यिकांशी अनौपचारिक गप्पा आणि पुस्तकांचे सान्निध्य यांचा आनंद घेण्यासाठी वर्षपूर्ती सोहळ्याचे निमित्त साधून ४ मे, २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील वाचनप्रेमींनी पुस्तकांच्या गावाला (भिलारला) अवश्य भेट द्यावी, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले.

Web Title: village of books Anniversary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.