दारूबंदीसाठी ग्रामस्थांचा मोर्चां
By admin | Published: December 23, 2015 12:43 AM2015-12-23T00:43:23+5:302015-12-23T00:43:23+5:30
वहाळ ग्रामस्थ मंडळाने नो लिकर झोनच्या भूमिकेवर ठाम राहत येऊ घातलेल्या शेट्टी लॉबीला आव्हान देण्यासाठी सोमवारी मोर्चा काढला होता.
पनवेल : वहाळ ग्रामस्थ मंडळाने नो लिकर झोनच्या भूमिकेवर ठाम राहत येऊ घातलेल्या शेट्टी लॉबीला आव्हान देण्यासाठी सोमवारी मोर्चा काढला होता. शाळकरी मुले, महिला, वयोवृद्ध अशी समाजातील सर्वच थरांवरील मंडळी या मोर्चात सहभागी झाली होती. वहाळ ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता सेक्टर १९ मधील चौकात झाली. या
ठिकाणी मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले.
शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रिया बबन मुकादम, पनपचे विरोधी पक्षनेते संदीप पाटील आदी नेते दारूबंदीच्या मुद्द्यावर आक्रमक होत मोर्चात सहभागी झाले होते.
तसेच पंचक्रोशीतील गावांतील सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यदेखील मोर्चात आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी सहभागी झाले
होते.
संस्कृती आणि समाज बिघडवू पाहणाऱ्या बार आणि लेडीज बारना विरोध करण्यासाठी नो लिकर झोनच्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे या सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितले, तर राजेंद्र पाटील यांनी पोलीस अधिकारी शेखर बागडे यांनी केलेल्या उद्दाम आणि उर्मट वक्तव्याचा समाचार घेत प्रकल्पग्रस्तांच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा दिला. बाळाराम पाटील यांनी गेली ८ वर्षे सातत्याने संघर्ष करीत खारघर नोड दारूविरहित क्षेत्र राखण्यात यश मिळत असल्याचा दाखला देत, उलवे विभागातदेखील अशी दारूबंदी अमलात आणण्यात आपण निश्चित यशस्वी होऊ, असा आशावाद दर्शविला.
मोर्चाच्या अखेरीस साहाय्यक पोलीस आयुक्त धनाराय दायमा यांना शाळकरी मुले व महिलांच्यासमवेत सरपंच भीमा वाघमारे यांनी
निवेदन सादर केले. त्यांनीदेखील दारूबंदीच्या मुद्द्यावर ग्रामस्थांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)