सहा समुद्रकिनाऱ्यांचं गाव...मालाड! 'ही' वैशिट्ये तुम्हाला माहित्येत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 10:39 AM2023-10-23T10:39:14+5:302023-10-23T10:41:49+5:30

मालाडचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथले समुद्रकिनारे. अक्सा, दानापानी, मढ, मार्वे, मनोरी, येरंगळ या समुद्रकिनाऱ्यांवर लोक सतत येतात. सहा समुद्रकिनाऱ्यांवर भटकण्याची संधी व मजा मिळू शकते.

Village of six beaches Malad | सहा समुद्रकिनाऱ्यांचं गाव...मालाड! 'ही' वैशिट्ये तुम्हाला माहित्येत का?

सहा समुद्रकिनाऱ्यांचं गाव...मालाड! 'ही' वैशिट्ये तुम्हाला माहित्येत का?

संजीव साबडे, मुक्त पत्रकार

मालाडचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथले समुद्रकिनारे. अक्सा, दानापानी, मढ, मार्वे, मनोरी, येरंगळ या समुद्रकिनाऱ्यांवर लोक सतत येतात. सहा समुद्रकिनाऱ्यांवर भटकण्याची संधी व मजा मिळू शकते.

मुंबईतील ग्रँट रोड वा चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर उतरलात की, तुम्ही गिरगाव चौपाटीवर जाल, विलेपार्ल्यात उतरलात तर जुहूचा समुद्र किनारा तुम्हाला आनंद देईल. पूर्वी दादरच्या किनाऱ्यावर तो आनंद मिळायचा, पण ती चौपाटीच खचली. पश्चिम उपनगरांतल्या एका स्टेशनवर उतरलात तर तुम्हाला सहा समुद्र किनाऱ्यांवर भटकण्याची संधी व मजा मिळू शकते. हे रेल्वे स्टेशन आहे मालाड.

स्टेशनच्या पूर्वेकडील सर्व भाग चढावाचा आहे. पूर्व द्रुतगती मार्गही बराच उंचावर आहे आणि त्याच्या पलीकडे आणखी डोंगर आहेत. त्यावर अप्पापाडा, कुरार गाव, पुष्पा पार्क, महिंद्रा कॉलनी हा सारा भाग आणखी उंचावर आहे. जोगेश्वरीपासून पुढे दहिसरपर्यंत पूर्वेकडे सर्वत्र हेच चित्र होतं. मालाडमध्ये आजही आहे. मालाडमधील सर्व गावं मात्र पश्चिमेला वसली आहेत. स्टेशनपासून बऱ्यापैकी जवळ आहे ऑर्लेम किंवा वळणाई. वळणावर असलेलं गाव म्हणून वळणाई. तिथं सोळाव्या, सतराव्या शतकापासून वस्ती आहे. ऑर्लेम चर्चच्या दस्तऐवजात तसा उल्लेख आहे.

सर्व मीठ आणलं जायचं ते ठिकाण : मीठ चौकी
चिंचोली हेही जवळच. मालवणी, खारोडी, राठोडी चिंचोली, मढ, अक्सा ही गावे मात्र स्टेशनपासून बऱ्यापैकी लांब. पूर्वेला अप्पापाडा आहे, तर पश्चिमेला काचपाडा. शिवाय लिंक रोडचा नाका मीठ चौकी या नावानं ओळखला जातो. तिथं पूर्वी मिठाची आगारं होती. सर्व मीठ आणलं जायचं ते ठिकाण मीठ चौकी. कोळी, आगरी, भंडारी, सूर्यवंशीय क्षत्रिय म्हणजे एसकेपी समाजाची मालाडमध्ये पूर्वापार वस्ती होती आणि आहे. खारोडी, राठोडी, मालवणी ही सर्व एकमेकांपासून दूर असलेली गावं आता एकमेकांना खेटली गेली आहेत. एसकेपी समाजाच्या गुरव यांनी मालवणीच्या गुरव गल्लीत १०० / १२५ वर्षांपूर्वी बांधलेलं मंदिर आजही व्यवस्थित आहे.

मालाडमधील मराठी भाषकांची वस्ती झपाट्याने कमी झाली 
महापालिका व सरकारने १९७०च्या सुमारास वेगवेगळ्या भागातील झोपड्या पाडल्या. त्यापैकी काहींना मालवणीला जमिनीचे तुकडे दिले. त्यामुळे तिथं बैठ्या चाळी खूप आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत मालाडमधील मराठी भाषकांची वस्ती झपाट्याने कमी झाली आहे. हे प्रामुख्याने नोकरदार व छोट्या व्यावसायिकांचे गाव आहे. मालाडचा सोमवारी बाजार प्रसिद्ध.

लोक अन्नधान्य या बाजारातून आजही घेतात. तिथं फटाक्यांची मोठी दुकानं वर्षभर सुरू असतात. लग्न वा अन्य समारंभात लागणारे अश्वरथ इथून भाड्याने दिले जातात. मालाड स्टेशनच्या पश्चिमेकडे जवळच कपड्यांचा मोठा बाजार भरतो. साड्या, ड्रेसेस व ड्रेस मटेरियल वाजवी भावात मिळत असल्याने तिथं सतत महिला व मुलींची गर्दी दिसते. 

मालाडचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथले समुद्र किनारे. अक्सा, दानापानी, मढ, मार्वे, मनोरी, येरंगळ या समुद्र किनाऱ्यांवर लोक सतत येतात. मढ हे बेट आहे. त्यामुळे तिथं बोटीनं वा बसने जाता येतं. या बेटावर ख्रिस्ती समाजाची अधिक वस्ती आहे. मढचा किल्ला आणि तेथील चर्च या सोळाव्या शतकातील वास्तू महत्त्वाच्या आहेत. शिवाय पोर्तुगीज काळातील अनेक घरं आजही पाहायला मिळतात.

Web Title: Village of six beaches Malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई