मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून 'एक गाव एक दिवस दत्तक' घेण्याचे ठरविले आहे. समर्थ सामाजिक सेवा संस्थेच्या सहकार्या$ने महामंडळाने हे पाऊल उचलले आहे. याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीच्या भवितव्यासाठी महामंडळाने विविध योजनाही घोषित केल्या आहेत.'एक गाव एक दिवस दत्तक' या योजनेच्या अंतर्गत महामंडळ विक्रमगड येथील ४ आदिवासी पाडे एक दिवस दत्तक घेणार असून, तेथील लोकांना अन्न, वस्त्र आणि इतर मूलभूत गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी आयोजित या उपक्रमात या पाड्यांवरील रहिवाश्यांसाठी आरोग्य शिबीरही भरविण्यात येणार आहे. तसेच तेथील मुलांना शालेय साहित्याचे वाटपही केले जाणार आहे.चित्रपट कलावंत व निर्मात्यांच्या सोयीसाठी, तसेच चित्रपटसृष्टीत योग्य सिस्टीम कार्यरत होण्यासाठी महामंडळ कायदेशीर सल्लागाराची नेमणूक करणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी स्पष्ट केले. महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे महामंडळाने चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांच्या सहकायार्ने विविध योजना राबविण्याचेही निश्चित केले आहे. या अंतर्गत ज्येष्ठ रंगकर्मी विद्या पटवर्धन कलात्मक शिबीर घेणार असून, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की गाण्यांची कार्यशाळा घेणार आहेत. तसेच नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे चित्रपटांच्या धर्तीवर नृत्य शिबीर घेणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत एन्ट्री घेण्यासाठी एक विशिष्ट अशी पद्धत असते, परंतु ती आपल्याकडे अनेकांना माहित नसते. महामंडळाच्या सहकायार्ने ही प्रक्रिया उलगडून सांगण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांनी पुढाकार घेतला असून, याबाबतचे व्यासपीठ येत्या दसऱ्यापासून सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ज्या चित्रपटांना प्रदर्शनासाठी चित्रपटगृहे उपलब्ध होत नाहीत किंवा जे चित्रपट तयार होऊनही प्रदर्शित होऊ शकलेले नाहीत अशा चित्रपटांसाठी 'डायरेक्ट टू होम' ही योजना निर्माण करण्यात येत असल्याची माहिती अनंत पणशीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
एक गाव एक दिवस दत्तक!
By admin | Published: October 01, 2015 11:20 PM