रिफायनरीच्या जाहीरातीवरून संताप, नाणारवासियांची सामनाच्या कार्यालयावर धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 06:41 PM2020-02-15T18:41:55+5:302020-02-15T18:42:28+5:30
मुंबई - रत्नागिरीतील नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. मात्र याच प्रकल्पाची माहिती देणारी ...
मुंबई - रत्नागिरीतील नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. मात्र याच प्रकल्पाची माहिती देणारी जाहीरात आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने नाणारवासीय संतप्त झाले असून, नाणारवासियांच्या प्रतिनिधींनी या जाहीरातीबाबत जाब विचारण्यासाठी थेट सामनाच्या कार्यालयाला धडक दिली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेनं नाणारविरोधाची धार तीव्र करत प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. मात्र सत्तेत येताच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे नाणारमधील रिफायनरी विरोधात सातत्यानं आक्रमक होणाऱ्या शिवसेनेनं त्यांची भूमिका बदलली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली आहे. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर जाहिरातीत आहे. 'रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच', असा उल्लेख जाहिरातीमध्ये आहे.
नाणार रिफायनरीच्या उभारणीत दीड लाख लोकांना रोजगार मिळेल. रिफायनरी कार्यान्वित झाल्यामुळे २० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळतील. यामुळे कोकणवासियांचं स्थलांतर थांबेल, असा दावा आरआरपीसीएलनं जाहिरातीत केला आहे. शिवसेनेनं याआधी सातत्यानं नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. भाजपासोबत सत्तेत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाणारविरोधात भूमिका घेतली होती. मात्र आता सत्तेत येताच शिवसेनेच्या मुखपत्राच्या पहिल्याच पानावर नाणारची जाहिरात आल्यानं कोकणात शिवसेनेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
नाणारबद्दल काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
नाणार जाणार नाही, तर इथे होऊ घातलेला प्रकल्प जाणार. कोणत्याही परिस्थितीत हा विनाशकारी प्रकल्प कोकणात होऊ दिला जाणार नाही, अशी घोषणा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उद्धव ठाकरे यांनी केली होती. विशेष म्हणजे नाणारमधल्याच सभेत त्यांनी ही घोषणा केली होती. कोकणच्या भूमीत आमची हाडामासाची, रक्ताची नाती जोडलेली आहेत. त्यांना विकत घेता येणार नाही. हा प्रकल्प इतकाच चांगला असेल तर तो गुजरातला घेऊन जा. इथे प्रकल्प लादायचा प्रयत्न करू नका. हा प्रकल्प नाणारमध्ये नाहीच, पण महाराष्ट्रातही होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. जमिनी मोजणी होऊ देऊ देऊ नका, कुणी मोजणी करायला आलाच तर त्याला शिवसेना स्टाइलने उत्तर द्या, असं आवाहनदेखील त्यांनी केलं होतं.