"महाराष्ट्रवासीयांनी दत्तक घ्यावी उत्तर प्रदेशातील गावे, तर युपीतही महाराष्ट्र भवन"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 06:34 AM2022-11-28T06:34:00+5:302022-11-28T06:35:22+5:30
महाराष्ट्र भवन उभारण्याची मंत्र्यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : उत्तर प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारू, तसेच देवदर्शनासाठी येणाऱ्या मराठी भाविकांसाठी महाराष्ट्र भवन बांधण्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्रदेव सिंह यांनी दिली. उत्तर प्रदेशातील गुंडाराज संपले आहे. देशात आर्थिक प्रगतीत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये येऊन आपल्या गावांना दत्तक घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या वतीने हाटकेश भागात सुविधा भूखंडात कवी हरिवंशराय बच्चन हिंदी भाषा भवनचे भूमिपूजन स्वतंत्रदेव यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत त्रिपाठी, कृपाशंकर सिंह, आमदार प्रताप सरनाईक, आयुक्त दिलीप ढोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजू भोईर, उत्तर भारतीय समाजाचे नेते विक्रमप्रताप सिंह यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात कार्यक्रम झाला.
स्वतंत्रदेव पुढे म्हणाले की, उत्तर भारतीय महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी प्राण द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत. उत्तर प्रदेशच्या गल्लीबोळातही गणेशाेत्सव साजरा होत असून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशाचे नाते घट्ट बनले आहे. हिंदू साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यांच्यामुळेच आज आपण सर्वजण आहोत, हे विसरता कामा नये. सीमावादप्रकरणी कर्नाटक सरकारचा कृपाशंकर यांनी निषेध केला, तर निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा पहिला आशीर्वाद बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई यांचा घेतल्याची आठवण चंद्रकांत त्रिपाठी यांनी सांगितली. हिंदी भाषा भवन साकारत असल्याबद्दल आ. सरनाईक यांचे त्यांनी कौतुकही केले, तर उत्तर प्रदेश सरकारने तेथील प्रमुख शहरांत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा. अयोध्या, काशी या तीर्थक्षेत्री दर्शनासाठी जाणाऱ्या मराठी भाविकांसाठी तेथे महाराष्ट्र भवन उभारावे, अशी मागणी सरनाईक यांनी केली.
मराठी एकीकरण समितीची निदर्शने
हिंदी भाषिक भवनाला विरोध करून नाट्यगृहाबाहेर मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे फडकावून निषेध केला. यावेळी पोलिसांनी समितीच्या गोवर्धन देशमुख, प्रदीप सामंत यांच्यासह १२ जणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. मुन्शी प्रेमचंद भवन असे नाव महासभेने ठरवले असताना ते बदलून हिंदी भाषा भवन करण्यास विरोध आहे, असे समितीने सांगितले.