विनायक मेटेंचा शर्ट, डिसले गुरुजींची आमदारकी
सकाळच्या गोंधळानंतर विधान परिषदेत चर्चेची घाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विधान परिषदेत विनायक मेटेंच्या शर्टापासून डिसले गुरुजींना आमदारकी देण्यापर्यंत विविध मुद्द्यांवर जोरदार चर्चा झडल्या. सकाळच्या सत्रात घोषणाबाजी आणि गदारोळातच कागदपत्रे मांडण्यात आली. मराठा-धनगर आरक्षणावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली. तर, उत्तरार्धात पुरवणी मागण्यांवर दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी सलग चर्चा करत आपापली बाजू पुढे रेटत, मागण्याही केल्या.
दुपारी बारा वाजता सभागृहाच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाली. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारे काळे कपडे घातले होते. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तीव्र आक्षेप घेत, आधी तो शर्ट काढून या मगच बोलायची परवानगी देतो, असा पवित्रा घेतला. मात्र, मेटे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. यावर, जोपर्यंत तुम्ही तो शर्ट काढून येणार नाही तोवर कामकाजात सहभागी होता येणार नसल्याचे बजावले. अखेर दोन तासांनंतर मेटे यांनी काळ्या कपड्यांवर जॅकेट चढवले आणि त्यांना बोलायची मुभा मिळाली. मात्र, दोन तास मेटे आणि सभापती आपापल्या भूमिकेवर ठाम होते. या चकमकी झडत असतानाच दरम्यानच्या काळात जागतिक पुरस्कार मिळालेल्या सोलापूरच्या रणजीतसिंह डिसले गुरुजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या वेळी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी डिसले यांच्या कार्याचे कौतुक केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर डिसले यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली. अभिनंदनाचा हा प्रस्ताव संमत झाल्यानंतर आतापर्यंत राज्यासह देशभरात कोरोनाविरोधातील हुतात्म्यांना आणि मृत्युमुखी पडलेल्यांना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर, गदारोळातच विविध कागदपत्रे सादर करण्यात आली.
सकाळच्या सत्रातील गदारोळानंतर दुपारी कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. विविध सदस्यांनी औचित्याचे मुद्दे मांडले. त्यानंतर दोन वाजल्यापासून पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणाने या चर्चेला सुरुवात होत असते. मात्र, आज दरेकरांनी ही संधी विनायक मेटे यांना दिली. शर्टामुळे दोन तास बोलायची संधी न मिळलेल्या मेटेंनी जॅकेट चढवून मराठा आरक्षणाची मागणी करतानाच सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले. त्यानंतर साधारण सात तास चर्चा सुरू राहिली. मराठा, धनगर आणि ओबीसी आरक्षण, कोरोनाकाळातील उपाययोजना, केंद्राची कृषी विधेयकांवरून दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवत भाषणे केली. शिवाय, आपापल्या मतदारसंघ आणि विविध योजनांसाठी पुरवणी मागण्यांत तरतुदीची मागणीही पुढे रेटली. सहा तासांच्या चर्चेनंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर दिले.