'विनायका प्राण तळमळला... वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळं पाणी'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 09:20 AM2019-01-26T09:20:30+5:302019-01-26T09:21:42+5:30
26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कारांची नावे घोषित झाली.
मुंबई - प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या देशातील सर्वोच्च 'भारतरत्न' सन्मानासाठी निवड झाली आहे. त्यापैकी नानाजी देशमुख व भूपेन हजारिका यांना हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार न दिल्याने खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. विनायका प्राण तळमळला असे लिहून भारतरत्न पुरस्काराचे चिन्हा राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे.
26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कारांची नावे घोषित झाली. या नावानंतर सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चा झडू लागल्या आहेत. कारण, यंदा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला ‘भारतरत्न’ दिले जाईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. पण, यावेळी तीन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांचा सन्मान करण्याचे केंद्र सरकारने ठरविल्याचं दिसून आलं.
परभणी जिल्ह्यातील कडोली गावी जन्मलेल्या नानाजी देशमुख यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. तसेच आसाममध्ये 1926 साली जन्मलेल्या भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. आसामीच नव्हे, तर अनेक बंगाली व हिंदी चित्रपटांना व हजारो गीतांना संगीत देण्याचं काम हजारिका यांनी केलंय. त्यासोबतच, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या भारतरत्न यादीतून वीर सावरकरांना का वगळले, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर तोफ डागली. विनायका प्राण तळमळला... असे ट्विट करत राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, भारतरत्न नक्की कुणाला?. आज नानाजी देशमुख, भुपेश हजारीका आणि प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. मात्र, वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी आल्याचं संजय राऊत यांनी म्हटले. तर, सरकारच्या या भूमिकेबद्दल 'शेम शेम' लिहून आपला रोष व्यक्त केला आहे.
भारतरत्न नककी कुणाला?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2019
आज नानाजी देशमुख,भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले.
वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी.
शेम शेम
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2019