सिंधुदुर्गातील राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊत उद्या गृहमंत्र्यांना भेटणार, शिवसेनेचा राणेंवर 'प्रहार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 03:22 PM2022-02-19T15:22:50+5:302022-02-19T15:23:39+5:30
भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.
मुंबई-
भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. विनायक राऊत यांनी यावेळी सिंधुदुर्गात झालेल्या राजकीय हत्यांच्या मागे कुणाचा हात होता हे शोधून काढण्यासाठी त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जावी अशी मागणी गहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करणार असल्याचं सांगितलं.
सिंधुदुर्गात आजवर झालेल्या राजकीय हत्यांच्या प्रकरणात आजवर खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन सिंधुदुर्गातील राजकीय हत्यांच्या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी शिवसेना करणार आहे, असं विनायक राऊत म्हणाले.
ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रांची चोरी?
मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचं ट्विट नारायण राणे यांनी केलं होतं. मग केंद्रीय मंत्र्यानं ईडीच्या नावाचा दुरूपयोग करुन एखाद्याला अशी धमकी देणं पदाचा दुरुपयोग नाही का?, असा सवाल विनायक राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत राणेंनी हातमिळवणी केली आहे का? की ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रं चोरी केली आहेत का? कारण त्यांनी ट्विट केलेली माहिती त्यांना मिळालीच कुठून आणि मिळाली नसेल तर एका खासदारानं असं ट्विट करणं शोभतं का? असे सवाल करत विनायक राऊत यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचं यावेळी म्हटलं.
फडणवीसांचे व्हिडिओ दाखवून राणेंवर 'प्रहार'
नारायण राणेंनी केलेले आरोप म्हणजे खोदा पहाड आणि निकला कचरा असे असल्याचं सांगत विनायक राऊत यांनी राणेंच्या पत्रकार परिषदेचा समाचार घेतला. तसंच भाजपाच्या गुडबूकमध्ये राहण्यासाठी राणे अशा पत्रकार परिषदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचंही राऊत म्हणाले. यावेळी विनायक राऊत यांनी राणेंवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले होते. त्याचे व्हिडिओ दाखवले. लाव रे तो व्हिडिओ सांगत राऊत यांनी तीन व्हिडीओ दाखवून राणेंचा पर्दाफाश केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधान परिषदेत राणेंची कुंडली मांडली होती. सिंधुदुर्गातील काही खुनांबद्दलही फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. त्यामुळे आम्ही उद्या दिलीप वळसे पाटील यांना भेटून सिंधुदुर्गातील आजवरच्या राजकीय हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.