मुंबई - काँग्रेस खासदार राहुल गांधी जे काही करतायेत. त्याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी केले तर ठीक. पण, कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काय करत असतील तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा पुरवली आहे. त्यांची यात्रा सुरक्षित राज्याबाहेर पाठवू. परंतु महाराष्ट्रातील वातावरण त्यांना बिघडवू नये असा सूचक इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच, राहुल गांधींनी वाचून दाखवलेल्या सावरकरांच्या पत्रालाही फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. यावेळी, शरद पवारांचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काढलेली यात्रा ही भारत जोडो यात्रा नव्हे तर मोदी विरोधी जोडो यात्रा आहे. कारण, काँग्रेसला लक्षात आलं भारताची जनता मोदींशी जोडलेली आहे. त्यामुळे अस्तित्व टिकवायचं असेल देशभरात मोदींच्या विरोधकांना जोडायला हवं. अन्यथा देशात काँग्रेस विसर्जित होईल. त्यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघालेत अशा शब्दात फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. तसेच, दिवंगत प्रतप्रधान आणि राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधींनी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काढलेले उद्गगारही त्यांनी पत्राच्या माध्यमातून शेअर केले आहे.
२८ मे १९८९ रोजी शरद पवारांनी एका कार्यक्रमात भाषण करताना सावरकरांबद्दल आणि त्यांच्या विज्ञानवादी दृष्टीकोनाबद्दल भाषण केलं होतं. सावरकर हे खऱ्या अर्थाने या देशातले आद्य स्वातंत्र्यवीर होते. त्यांनी केलेल्या कामगिरीचं इतिहासात वेगळं काम आहे. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाला मोठी शक्ती देण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. सशस्त्र क्रांतीच्या विचारणीतूनच ही ताकद मिळाल्याची आवर्जून शरद पवार यांनी म्हटलं. १८५७ च्या स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पेटली. या लढ्यात अनेकांनी हौतात्म्य पत्कारलं. त्यानंतरच, सावकरांची स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिल्याचं शरद पवारांनी म्हलं होतं. तसेच, १३ मे १९९३ रोजी शरद पवारांनी सावकरांच्या जयंतीदिनी त्यांना पत्राच्या माध्यमातून आदरांजली वाहिली होती.
शिवसेनेलाही लगावला टोला
दरम्यान, महाराष्ट्रातील लोकांमध्ये नाराजी आहे. १३ वर्ष ज्यांनी काळापाणी, तुरुंगाची शिक्षा भोगली. त्यांच्याबद्दल ज्यांनी कधी जेल पाहिली नाही अशांनी बोलावं. त्यामुळे निश्चित लोकांमध्ये राहुल गांधींच्या विधानाबाबत संताप आहे. दरवेळेस राहुल गांधी सावरकरांबाबत वाटेल ते बोलतात. त्यानंतर शिवसेनेचे नेते बोलतात. सावरकरांसाठी ते सत्ता कधीच सोडू शकत नाही असा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचा घेतला आहे.