>> संकेत सातोपे
मुंबई : राजकीय शक्ती किती, यावरच कोणत्याही नेत्याचे मूल्यमापन होत असते, पण विनायक वाघधरे या मुंबईतील नगरसेवकाची ओळख होती ती त्यांच्या अचाट शारीरिक शक्तीसाठी! छातीवर धावता रोड रोलर घेणे, हातांनी लोखंडी पहार वाकविणे, दातांनी ट्रक ओढणे, धावत्या गाड्या हातांनी थांबविणे, अशा त्यांच्या अचाट शक्तीप्रयोगांना ७०च्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळाली. उद्योगपती जेआरडी टाटा यांनी त्यांना सुवर्णपदकाने गौरविले, तर पाँडीचेरीचे नायब राज्यपाल सयाजीराव सिलम यांनी ‘लोहपुरूष’ असा त्यांचा उल्लेख केला होता.
सिद्धीविनायक मंदिराजवळच्या आगार बाजार भाजी मंडईला कै. विनायक वाघधरे यांचे नाव देण्यात आले आहे. गोखले रोडवर त्यांनी १९७५ साली स्थापन केलेली अमर व्यायाम मंदिर ही व्यायामशाळा आजही सदृढ शरीरयष्टी कमावू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रेरणा देते.
१९२८ साली रत्नागिरी तालुक्यातील गावकोंड गावात जन्मलेल्या विनायक वाघधरे यांनी वयाच्या पंधराव्या वर्षीपासूनच व्यायामाला सुरुवात केली. सोबतच ते मनोरंजन म्हणून शक्तीचे प्रयोगही करू लागले. पुढे कोकणातील अन्य चाकरमान्यांप्रमाणेच नोकरीच्या शोधात मुंबईत येऊन ते एका कंपनीत चित्रफिती संकलनाचे काम करू लागले. मात्र त्यांच्या व्यायामात खंड पडला नाही. सर्वसामान्य माणसाच्या तुलनेत स्वत:च्या अचाट शारीरिक क्षमतेची जाणीव होऊ लागल्यावर त्यांनी शक्तीचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. यातील पहिला मोठा प्रयोग परळ येथील सेंट झेव्हिअर्स मैदानात २३ मार्च १९६६ रोजी करण्यात आला. माणसांनी भरलेली बैलगाडी, ट्रक छातीवर पेलण्याचे, तसेच अवाढव्य घोडा दातांनी उचलण्याचे त्यांचे चित्तथरारक प्रयोग प्रेक्षक श्वास रोखून पाहात असत. १९७५पर्यंत गणेशोत्सव, तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी अगदी गोव्यापर्यंत अनेक ठिकाणी हे शक्तीचे प्रयोग केले.
१९७३ साली आगर बाजारच्या ६४ क्रमांक वॉर्डमधून ते शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून गेले. तरुण पिढीला व्यायाम आणि शरीर सौष्ठवाकडे वळविण्यासाठी त्यांनी अमर व्यायाम मंडळाची स्थापना केली. त्यातून बळीराम तोडकरी, विठ्ठल देसाई, वसंत फोडकर, लहू फोडकर, बाळकृष्ण पारकर असे अनेक शिष्य घडविले. या अचाट ‘शक्तिमान’ नगरसेवकाची आठवण आजच्या तरुणांही तितकीच प्रेरणादायी आहे.
रोड रोलर छातीवरच थांबला... एका प्रयोगाच्या वेळी रोड रोलर वडिलांच्या छातीवर असतानाच बंद पडला. प्रचंड दाबामुळे बाबांच्या डोळ्यांत रक्त साकाळू लागले. प्रेक्षकांसह सगळेच धास्तावले होते. अखेर त्यांच्या शिष्यांनीच पुढे येऊन पूर्ण शक्तीनिशी रोलर मागे रेटला. त्यामुळे बाबांचे प्राण वाचले, अशी आठवण विनायक यांचा मुलगा आणि सुप्रसिद्ध टीव्ही दिग्दर्शक राजन वाघधरे यांनी ‘लोकमत’कडे सांगितली.