रंगनाथ पठारे यांना ‘विंदा करंदीकर जीवन गौरव’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:06 AM2021-02-12T04:06:58+5:302021-02-12T04:06:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठी भाषा विभागाच्यावतीने दिला जाणारा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ यंदा रंगनाथ पठारे यांना ...

'Vinda Karandikar Jeevan Gaurav' award to Ranganath Pathare | रंगनाथ पठारे यांना ‘विंदा करंदीकर जीवन गौरव’ पुरस्कार

रंगनाथ पठारे यांना ‘विंदा करंदीकर जीवन गौरव’ पुरस्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठी भाषा विभागाच्यावतीने दिला जाणारा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ यंदा रंगनाथ पठारे यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी याबाबतची घोषणा केली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सुभाष देसाई यांनी विविध पुरस्कारांची घोषणा केली. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा उपस्थित होत्या.

यावर्षीचा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. पठारे यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, वाङ्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्यपद भूषविलेले आहे. तर यावर्षीचा ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप ३ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. या प्रकाशन संस्थेने महाराष्ट्रात आणि गोव्यात मिळून अनेक पुस्तक प्रदर्शने भरवली आहेत. तसेच ही संस्था दरवर्षी ‘शब्दालय’ हा दिवाळी अंक प्रकाशित करते.

‘मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार’ यावर्षी डॉ. सुधीर रसाळ (औरंगाबाद) यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. रसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले असून, गेली ६० वर्षे ते मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि मराठी संस्कृती या क्षेत्रात लेखन करत आहेत. ‘कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार’ संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना घोषित करण्यात आला आहे. प्रत्येकी २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संजय भगत यांनी महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने तयार केलेला परिभाषा कोश सामान्य जनतेपर्यंत प्रथम संगणकाच्या माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य केले. तसेच आधुनिक तंत्रानुसार शासकीय कोश सर्व लोकांना पाहता यावे यासाठी स्वखर्चाने आधुनिकीकरण करून घेतले. मराठीचे अभ्यासक या संकेतस्थळाचा वापर करतात. तर मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांच्यामार्फत विविध प्रकाशने प्रकाशित होतात. त्यांचा पंचधारा नियतकालिकाचे प्रकाशन हा उपक्रम दीर्घकाळ सुरु आहे तसेच चर्चासत्रांचेही आयोजन केले जाते.

Web Title: 'Vinda Karandikar Jeevan Gaurav' award to Ranganath Pathare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.